वन विभागाच्या कार्यालयात टोळक्याचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:20 AM2020-09-25T00:20:45+5:302020-09-25T01:27:22+5:30

नाशिक : वन विभागाच्या त्र्यंबकरोडवरील पूर्व-पश्चिम कार्यालयात अज्ञात टोळक्याच्या जमावाने विनापरवानगी शिरकाव करत धुडगूस घातल्याची घटना गुरुवारी (दि.24) घडली. यावेळी जमावातील एका अज्ञात समाजकंटकाने वनरक्षकावर टिकावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; यावेळी अन्य कर्मचाऱ्यानी मध्यस्ती केल्याने हल्ला टळला.

A mob swarms the Forest Department office | वन विभागाच्या कार्यालयात टोळक्याचा धुडगूस

वन विभागाच्या कार्यालयात टोळक्याचा धुडगूस

Next
ठळक मुद्दे चहा टपरी चे अतिक्रमण हटविताना वाद : वनरक्षकावर टिकावाने हल्ल्याचा प्रयत्न

नाशिक : वन विभागाच्या त्र्यंबकरोडवरील पूर्व-पश्चिम कार्यालयात अज्ञात टोळक्याच्या जमावाने विनापरवानगी शिरकाव करत धुडगूस घातल्याची घटना गुरुवारी (दि.24) घडली. यावेळी जमावातील एका अज्ञात समाजकंटकाने वनरक्षकावर टिकावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; यावेळी अन्य कर्मचाऱ्यानी मध्यस्ती केल्याने हल्ला टळला.

त्र्यंबकरोडवर नाशिक पूर्व, पश्चिम वन विभागाचे उपवनसंरक्षक, नाशिक वनक्षेत्रपाल यांचे मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयाच्या आवारात विनापरवाना एका चौकीदाराच्या नातेवाईकांकडून चहा टपरी मागील काही वर्षांपासून चालविली जात आहे; मात्र कोरोनाचे प्रादुर्भाव तेजीने होत असताना शासकीय आदेशानुसार उपवनसंरक्षकांकडून वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांना या टपरीचे अतिक्रमण हटविण्याबाबतचे लेखी आदेश प्राप्त झाले. यानुसार दोन दिवसांपूर्वी या चहा विक्रेत्याला समज देण्यात येऊन टपरी बंद करण्याबाबत सूचना करण्यात आली. कारण या टपरीवर चहा पिण्याच्या निमित्ताने लोकांची गर्दी होऊ लागली होती. यावेळी कोरोनावर शासनाने सुचविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन होत असल्याचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या निदर्शनास आले. त्यांनी भदाणे यांना याबाबत जाब विचारला आणि त्वरित चहा टपरी बंद करण्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भदाणे यांनी या चहा विक्रेत्याला गाशा गुंडाळण्यासाठी 'खाकी'च्या शैलीत सांगितले असता तेथील चहा विक्रेत्याच्या नातेवाईक चौकीदाराने अज्ञात जमावाला बोलावून घेत वाद घातला. यावेळी जमावाला उपवनसंरक्षक कार्यालयात रोखण्यासाठी पुढे आलेले वनरक्षक मेजर दादा सोनवणे यांच्यावर जमावाने चाल केली. यावेळी एकाने तर थेट टिकाव उचलून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून तात्काळ सरकारवाडा पोलिसांची मदत वनविभागाने बोलाविली. गस्तीपथकाचे वाहन दाखल होताच जमावाने पळ काढण्यास सुरवात केली. दरम्यान झालेल्या झटापटीत सोनवणे यांचा गणवेश फाटला. पोलिसांनी आपल्या शैलीत जमावाला पांगविले. वेळीच पोलीस दाखल झाल्यामुळे आक्रमक जमावांकडून शासकीय वाहने व कार्यालयाचे नुकसान होता होता टळले. एकूणच या सगळ्या अतिक्रमण हटविण्याच्या शासकीय कारवाईला संबंधितांकडून विरोध झाला. शासकीय कामात अडथळा आणत शासकीय कार्यालयात येऊन शिवीगाळ आरडाओरड, मारहाण करण्यापर्यंतचा धिंगाणा घातला गेला. या सगळया प्रकरणाबाबत मुख्य वनसंरक्षकांकडून काय पावले उचलली जाणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात वनविभागाकडून शासकीय स्तरावर कुठलीही तक्रार वनक्षेत्रपाल कार्यालयाकडून करण्यात आलेली न्हवती.

धिंगाणा सीसीटीव्हीत कैद
अज्ञात जमावाने वनविभागाच्या कार्यालयात घातलेला सगळा धिंगाणा येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कार्यालयीन सुरक्षेची जबाबदारी असलेल्या वनरक्षकांकडून जमावाला रोखण्याचा प्रयत्न झाल्याने जमावाने त्यांच्यावर चाल करत गणवेशाचे नुकसान केल्याचेही सीसीटीव्हीत दिसून येते.
 

 

Web Title: A mob swarms the Forest Department office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.