विद्यार्थ्यांवर वाढतोय ‘मोबाइल अॅप’चा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 01:11 AM2019-09-01T01:11:59+5:302019-09-01T01:12:35+5:30
माझा एवढासा मुलगा माझ्यापेक्षा अतिशय उत्कृष्टपणे मोबाइल हाताळतो, असे कौतुकाने सांगणारे अनेक पालक त्यांचा पाल्य मोबाइलच्या विळख्यात गुरफटला जात असल्याचे दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
नाशिक : माझा एवढासा मुलगा माझ्यापेक्षा अतिशय उत्कृष्टपणे मोबाइल हाताळतो, असे कौतुकाने सांगणारे अनेक पालक त्यांचा पाल्य मोबाइलच्या विळख्यात गुरफटला जात असल्याचे दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यातच काही खासगी शाळांनी वेगवेगळ्या प्रकारचे अॅप विकसित करून ते प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकरिता सूचना आणि गृहपाठाचा तपशीलही या अॅपद्वारेचे देत असून, विविध सण उत्सव व शाळांकडून होणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर यू-ट्यूबसारख्या सोशल साइटवरून व्हिडिओ, गाणे आणि गोष्टी डाउनलोड करण्यासाठी विविध लिंकही सुचविल्या जात आहे. त्यामुळे आधीच शालेय जीवनातील स्पर्धेच्या ओझ्याखाली दबलेले विद्यार्थी दिवसेंदिवस मोबाइल अॅपच्या विळख्यात अडकत असून, त्यांच्यावर आॅनलाइनचे दडपणही वाढत चालले आहे.
शालेय शिक्षणात मोबाइल अॅपचे लोण विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सर्वाधिक प्रमाणात दिसून येत असून, पूर्व प्राथमिकच्या ज्युनियर केजी ते प्राथमिकच्या चौथीपर्यंच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, गृहपाठ व इतर उपक्रमांच्या सर्व सूचना मोबाइल अॅपच्या माध्यमातूनच दिल्या जात आहेत. त्यामुळे मुले शाळेतून घरी येताच. आई-वडिलांचा मोबाइल मागतात. कारण त्यांना अभ्यासापेक्षाही मोबाइलवरील अॅप पाहण्याची आणि त्यातील विविध खेळ खेळण्याचीच अधिक उत्सुकता असते.
अशावेळी त्याला मोबाइल मिळाला नाही तर त्यामुळे मुलांना येणारा राग आणि त्यावरून त्यांची होणारी चिडचिड आता नित्याची बाब होत असून, बहुतांश घरांमध्ये हेच चित्र निर्माण होऊ लागल्याने पालकांची डोकेदुखी वाढली आहे.
पूर्वी विद्यार्थी शाळेतून घरी आल्यावर त्याचे पालक शाळेची नोंदवही पाहून त्यातील सूचनानुसार त्याचा गृहपाठ पूर्ण करून घेत असे. परंतु आता असा प्रकार इतिहास जमा होत असून, गृहपाठाची नोंदवहीच कालबाह्य होत आहे.
तांत्रिकदृष्ट्या आपली शाळा इतरांच्या पुढे असल्याचे दर्शविण्यासाठी शाळांकडून विविध प्रकारचे अॅप डाउनलोड करण्याच्या सूचना पालकांना दिल्या जात असून, त्या माध्यमातूनच शाळेतील विविध उपक्रमांचा सरावही करून घेण्यास सांगितले जात असल्याने चिमुकल्या मनावर मोबाइलची ही अॅपबिती दिवसेंदिवस वाढीस लागली आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मोबाइल मुलांसाठी घातक
वयाच्या पहिल्या वर्षापासूनच मुलांच्या हातात दिला जाणारा मोबाइल हा त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरतो आहे. डोळे लाल होणे, डोळे कोरडे पडणे, दृष्टी कमी होणे असे गंभीर दुष्परिणाम समोर येत असून, त्यासोबतच डोकेदुखी, झोप कमी होऊन झोपेशी संबंधित आजार मुलांना होऊन त्यांच्यात चिडचिडेपणा वाढून मुले एकाकी आणि स्वमग्न होण्याचा धोका बळावत असल्याचे मत बाल मानसशास्त्रज्ञ व्यक्त करतात.
शाळांकडून उपलब्ध करून दिल्या जाणाºया अॅपची अॅक्सेस केवळ पालकांनाच द्यायला हवा. मुलांच्या हातात मोबाइल गेला तर ते केवळ होेमवर्क करूनच थांबतील असे नाही. त्यांची जिज्ञासू वृत्ती त्यापेक्षाही अधिक काही मोबाइलमध्ये शोधून त्यांच्याच आहारी जाऊ शकते. त्यामुळे मुलांना स्वमग्नता, विस्मरण, एकाकीपणासारख्या समस्याने सामोरे जावे लागते. हा प्रकार केवळ शाळांच्याच अॅपमुळेच नाही, तर सामान्यपणे मोबाइलच्या अतिवापारमुळे होऊ शकतो. त्यामुळे लहानमुलांपासून मोबाइल दूर ठेवणे आवशयक आहे.
- डॉ. शामा कुलकर्णी, बाल मानसोपचार तज्ज्ञ
मोबाइलचा अतिवापर चिंतेचा विषय
आधुनिक काळाची कास धरणे ही काळाची गरज असली तरी लहान मुलांमधील मोबाइलचा अतिवापर हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय बनत असताना स्मार्ट फोनचा वापर मुलांमधील स्मार्टनेस गमावून बसण्यास कारणीभूत ठरत आहे. सुरुवातीला मुलांना खेळण्याकरिता अथवा शांत राहण्यासाठी एखादे गाणे अथवा सोपा गेम सुरू करून देणे म्हणजे मुलांना मोबाइलचे वेड लावण्याची पहिली पायरी ठरत आहे. परिणामी मुले मोबाइलच्या विळख्यात अडकत चालली आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात भावी पिढीला मोबाइलच्या तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही. परंतु शाळांद्वारे दिले जाणारे अॅप पालकांच्याच वापरासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मुलांच्या हातात मोबाइल जाऊन त्यांना मोबाइलचे व्यसन लागणार नाही. यासाठी पालकांनीही विशेष खबरदारी घेणे आवश्यक असून, मुलांना मोबाइलपेक्षा मैदानावर खेळण्याची संधी उपलब्ध करून द्यायला हवी.
- राजेंद्र निकम, मुख्याध्यापक