भेटवस्तूंच्या यादीत मोबाइलला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:57 AM2017-09-26T00:57:53+5:302017-09-26T00:58:00+5:30
आनंदोत्सवाचा सण असलेल्या दिवाळीच्या खरेदीला आतापासूनच सुरुवात झाली असून, यावर्षी अनेक भावा-बहिणींना तसेच आई-वडील मुलांना दसरा व दिवाळी भेट म्हणून मोबाइल देण्याचे नियोजन करीत असून, भेटवस्तुंच्या यादीत ग्राहकांकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाइलला अधिक पसंती मिळत आहे. भेटवस्तू वेळेवर मिळावी यासाठी अनेकांनी आतापासूनच इंटरनेट व दुकानात प्रत्यक्ष भेट देऊन मोबाइलचा तुलनात्मक शोध घेऊन बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक : आनंदोत्सवाचा सण असलेल्या दिवाळीच्या खरेदीला आतापासूनच सुरुवात झाली असून, यावर्षी अनेक भावा-बहिणींना तसेच आई-वडील मुलांना दसरा व दिवाळी भेट म्हणून मोबाइल देण्याचे नियोजन करीत असून, भेटवस्तुंच्या यादीत ग्राहकांकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाइलला अधिक पसंती मिळत आहे. भेटवस्तू वेळेवर मिळावी यासाठी अनेकांनी आतापासूनच इंटरनेट व दुकानात प्रत्यक्ष भेट देऊन मोबाइलचा तुलनात्मक शोध घेऊन बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. भाऊ व बहिणीला दसरा, दिवाळी भेट देताना नियोजित वेळ चुकू नये व त्याला किंवा तिला आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठी यावर्षी अॅँड्रॉइड मोबाइल भेटवस्तू म्हणून देण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. एकीकडे तरुणाईचा अत्याधुनिक मोबाइलकडे कल वाढलेला असताना विविध मोबाइल कंपन्यांनी शून्य टक्के व्याजदराने मोबाइलसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे महागात महाग मोबाइल खरेदी करणे अगदी सोपे झाले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले ४ ते ६ जीबी रॅम आणि ३२ व ६४ जीबीची रोम असलेल्या मोबाइलला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भेटवस्तू म्हणून मोबाइल देताना तो फूल एचडी असावा व त्याचा प्रोसेसरही उत्तम परफॉर्म करणारा असावा याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. सर्वसाधारण वापरात असलेले, परंतु अॅँड्रॉइड फोनची क्रेझ असलेले ग्राहक १.५ ते ३ जीबी रॅम आणि एचडी डिस्प्लेच्या फोनला पसंती देत आहेत.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच विविध मोबाइल कंपन्यांनी दसरा-दिवाळीच्या सवलती जाहीर केल्याने विक्रीत वाढ झाली आहे. १० ते १५ हजार रुपयांपर्यंतचे मोबाइल भेटवस्तू देण्यासाठी आणि स्वत:साठीही वापरता येत असल्याने या सेगमेंटला अधिक मागणी आहे. - चेतन वाणी, संचालक,
सध्या बाजारात सॅमसंग, अॅपल, व्हीओ, अप्पोसारख्या विविध कंपन्यांच्या मोबाइलची ग्राहकांकडून चांगली चौकशी होत आहे. एका कुटुंबात जवळपास तीन-तीन चार मोबाइल खरेदी होतात. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सच्या अन्य वस्तुंपेक्षा मोबाइलची मागणी ३० ते ३५ टक्क्यांनी अधिक आहे. - जितेंद्र बेलगावकर, संचालक, जितेंद्र वर्ल्ड
मोबाइलची आॅनलाइन खरेदी वाढल्यामुळे व्यवसाय प्रभावित झाला आहे. परंतु, दुकानात विक्रेता मोबाइलचा डेमो देतो. तसेच विक्र ीनंतरही सेवा देतो. तसेच कंपन्यांचे शून्य टक्के व्याजदराने अर्थसाहाय्यही उपलब्ध असल्याने सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाइलला मागणी वाढली आहे. - मुकेश मुंदडा, संचालक, मुंदडा इलेक्ट्रॉनिक्स