मोबाइल आयएमईआय बदलणारी टोळी गजाआड
By admin | Published: July 10, 2017 12:19 AM2017-07-10T00:19:05+5:302017-07-10T00:19:19+5:30
आझादनगर :मोबाइल दुरुस्ती करणाऱ्या सहा मोबाइल दुकानांवर पोलिसांनी एकाचवेळी छापा टाकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आझादनगर : शहरातील मोबाइल दुरुस्ती करणाऱ्या दुकानदारांकडून चोरीच्या मोबाइलचे आयएमईआय नंबर बदलून देण्यात येत असल्याच्या संशयावरून शहरातील विविध भागातील सहा मोबाइल दुकानांवर पोलिसांनी काल रात्री आठ वाजता एकाचवेळी छापा टाकला. यात सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आयएमईआय क्रमांक बदली करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह एकूण ५९८ मोबाइल, लॅपटॉप असा १४ लाख ५६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सहापैकी तीन आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना बुधवारपर्यंत (दि. १२) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. मालेगाव शहर व परिसरातील मोबाइल चोरीच्या घटनेत वाढ होऊन नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांनी याची गंभीर दखल घेत शहरातील काही दुकानदारांकडून मोबाइलचे एमआयईएम नंबर बदलून दिले जात असल्याची माहिती काढून शनिवारी रात्री आठ वाजता शहरातील सहा मोबाइल दुकानांवर छापा मारला. विशेष म्हणजे, राजमाने यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचना देत सहाही ठिकाणी एकाचवेळी छापा मारला. यावेळी आझादनगर पोलीस ठाण्याअंतर्गत गांधी चौक येथील देशमुख मोबाइल शॉपीचा मालक सुफीयान देशमुख, चंदनपुरीगेट येथील मोहंमद मोबाइल शॉपीचे एजाज अहमद, नयापुरा येथील हिंदुस्तान मोबाइलचे मालक सोहेल अहमद निसार अहमद, छावणी पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर येथील राजू मोबाइल शॉपीचे तमसील बशर एकबाल अहमद, शहर पोलीस ठाणे अंतर्गत किदवाई रोडवरील फाइन टच मोबाइल शॉपीचे लईक अहमद मोहंमद मुर्तुजा व आयेशानगर पोलीस ठाणे हद्दीतील सुपर मार्केट येथील सेल-झोनचा मालक अबुलऐस एकबाल अहमद यांना ताब्यात घेण्यात आले.वरील सर्व संशयितांकडून पाच सीपीओ, दोन लॅपटॉप, दोन हार्डडिक्स, २० डोंगल व मोबाइलचे मूळ क्रमांक बदलण्यासाठी वापरण्यात येणारे वेगवेगळ्या प्रकारचे मोबाइल सॉफ्टवेअर मारण्याकामी वापरले जाणारे साहित्य तसेच आयएमईएम क्रमांक बदललेले मोबाईल व एकूण ५९८ मोबाइल असा १४ लाख ५६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील सर्व आरोपींना रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आणून राजमाने यांनी विश्वासात घेतले असता त्यांनी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.रात्री उशिरा सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना न्यायालयात उभे केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.आझादनगर पोलीस ठाणे अंतर्गत तीन मोबाइल दुकानांवर कारवाई करण्यात आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याकामी उशीर झाल्याने या तीन संशयितांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती राजमाने यांनी दिली. नागरिकांनी चोरीचे मोबाइल घेऊ नये. तसे कृत्य करताना कुणी आढळल्यास पोलिसांना त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन पोद्दार यांनी केले.