मोबाइल इंटरनेट सेवा दीड तास बंद
By admin | Published: June 6, 2017 03:35 AM2017-06-06T03:35:58+5:302017-06-06T03:36:06+5:30
शेतकरी या बंदमध्ये उतरल्याचेसंदेश, व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होऊन परिस्थिती चिघळू नये यासाठी दीड तास मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती़
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : संपूर्ण कर्जमाफी, शेतमालास हमीभाव व स्वामिनाथन समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील विविध शेतकऱ्यांनी एकत्र येत चार दिवसांच्या संपानंतर सोमवारी (दि़५) महाराष्ट्र बंदची हाक दिली़ यामध्ये नाशिक शहरासह जिल्ह्यातील शेतकरी या बंदमध्ये उतरल्याचे विविध ठिकाणचे संदेश, व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होऊन परिस्थिती चिघळू नये यासाठी सुमारे दीड तास शहरातील मोबाइल इंटरनेट सेवा प्रशासनाकडून बंद करण्यात आली होती़ याबाबतचे संदेश आयडिया कंपनीकडून मोबाइलधारकांना पाठविण्यात आले होते़सोमवारी सकाळपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको तसेच भाजीपाला रस्त्यावर टाकून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला़ या महाराष्ट्र बंदमध्ये शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन सोशल मीडिया व्हॉट्स अॅप, फेसबुक, टिष्ट्वटर या माध्यमातून व्हायरल केले जात होते़ अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली जनावरे, बैलगाड्या रस्त्यावर आणून रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला़ या आंदोलनाचे पडसाद शहर, जिल्हा तसेच राज्यभरात पसरू नये यासाठी प्रशासनाने सावधानता बाळगत मोबाइल इंटरनेट सेवा बंद केली होती़ आयडिया, रिलायन्स आदी मोबाइल कंपन्यांनी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आपली मोबाइल इंटरनेट सेवा बंद केली़