अक्राळेला ग्रामस्थांनी पकडले मोबाईल चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 11:46 PM2021-05-29T23:46:25+5:302021-05-29T23:55:46+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील अक्राळे गावालगत असलेल्या मोबाईल व किराणा दुकानातून चोरी करू पाहणाऱ्या तीन चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील अक्राळे गावालगत असलेल्या मोबाईल व किराणा दुकानातून चोरी करू पाहणाऱ्या तीन चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
शुक्रवारी (दि. २८) रात्री अक्राळे गावालगत जानोरी-दिंडोरी रस्त्यालगत असलेल्या नितीन रामचंद्र केंदळे यांच्या महालक्ष्मी किराणा व मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर वाकवून तीन चोरट्यांनी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास प्रवेश केला. परंतु चोरी करीत असताना ग्रामस्थांना अचानक जाग आल्याने ग्रामस्थांनी तीनही चोरट्यांना पळून जात असताना पकडले.
या वेळी चोप देऊन दिंडोरी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. दिंडोरी पोलिसांनी याप्रकरणी दुकान मालक नितीन केंदळे (रा. अक्राळे) यांच्या तक्रारीवरून संशयित गोरख भाऊसाहेब गोतरणे, महेश संजय जोंधळे व श्रावण अशोक नेहरे (सर्व रा. जऊळके, दिंडोरी, ता. दिंडोरी) या तिघांवर गुन्हा दाखल केला. तर वरील तीन संशयितांच्या तक्रारीवरून दुकान मालक नितीन केंदळे व इतर सात ते आठ अनोळखी इसमाविरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड अधिक तपास करीत आहेत.