सानू-टोनू-मोनू गँगच्या २० सराईत गुन्हेगारांवर ‘मोक्का’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 20:13 IST2021-01-05T20:13:00+5:302021-01-05T20:13:49+5:30
पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात टोळीतील एकूण ११ संशयितांसह तीघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित डझनभर संशयित फरार आहेत. यामध्ये काही संशयित गुन्हेगार हे अंधेरी, उल्हासनगर, कल्याण या शहरांमधील आहे.

सानू-टोनू-मोनू गँगच्या २० सराईत गुन्हेगारांवर ‘मोक्का’
नाशिक : चाकू, कोयते घेऊन नाशिकरोड ते उपनगरपर्यंत दहशत माजवून सर्रासपणे शरिराविरुध्द गुन्ह्यांत सक्रीय राहणाऱ्या 'सानू-टोनू-मोनह्' या म्हस्के भावंडांच्या टोळीतील २० सराईत गुन्हेगारांवर नाशिक शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. या टोळीने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात योगेश पन्नालाल चायल (२३) याच्यावर कोयत्याने सपासप वार करत ठार मारले होते. पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात टोळीतील ११ संशयितांसह तीन अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. चायल खून प्रकरणात पोलिसांना अद्याप १२ संशयितांना अटक करायची आहे. या बारांपैकी सहा संशयित गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात आला आहे.
शहरात खून, प्राणघातक हल्ले यांसारखे शरीराविरुध्दचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी परिमंडळ-१ व २ मधील संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांची जंत्री काढत तपासाचे आदेश दिले आहे. यानुसार नाशिकरोड-उपनगर भागात दहशत माजवून कायदासुव्यवस्थेला वारंवार धोक्यात आणणाऱ्या सानू-टोनू-मोनूच्या टोळीवर अखेर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात टोळीतील एकूण ११ संशयितांसह तीघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित डझनभर संशयित फरार आहेत. यामध्ये काही संशयित गुन्हेगार हे अंधेरी, उल्हासनगर, कल्याण या शहरांमधील आहे. तसेच काही नाशिक शहर व परिसरातील असून त्यांनी शहरातून परजिल्ह्यांमध्ये आश्रय घेतला असून सर्वांना लवकरात लवकर अटक करण्यास पोलिसांना यश येईल, असा आशावाद पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. यावेळी उपायुक्त विजय खरात, पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहायक आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे, अनिल शिंदे उपस्थित होते.
टोळीमधील हे गुन्हेगार गजाआड
टोळीप्रमुख सागर सुरेश म्हस्के ऊर्फ सानू पाईकराव (२२,जेलरोड), हर्ष सुरेश म्हस्के ऊर्फ टोून पाईकराव, साहिल सुरेश म्हस्के ऊर्फ मोनू पाईकराव (२०)रोहित सुरेश लोंढे ऊर्फ भुऱ्या (२१,रा.देवळाली गाव), जय ऊर्फ मारुती वाल्मिक घोरपडे (१८,रा.विहितगाव), राहुल भारत तेलारे ऊर्फ भांडा (१९,रा.बागुलनगर), कलाम सलीम राईन (१९,रा.नाशिकरोड), सत्तू बहीरु राजपुत (२०,रा.जयभवानीरोड), जॉन चलन पडेची (२८,रा.देवळाली कॅम्प), योगेश श्रावण बोडके (२३,रा.पंचवटी), अमन हिरालाल वर्मा उर्फ मामा (३५,रा.समतानगर,अंधेरी), यांच्यासह तीन अल्पवयीन गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी चायल याच्या खूनाच्या गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, दुचाकी वाहनांसह कोयता, चाकू ही हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.