‘रोलेट’ चालविणाऱ्या पाच संशयितांविरुध्द लवकरच ‘मोक्का’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:15 AM2021-03-26T04:15:14+5:302021-03-26T04:15:14+5:30
त्र्यंबकेश्वर पाेलीस ठाणे हद्दीत रोलेट जुगारात लाखो रुपये गमावल्यानंतर कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढल्याने आलेल्या नैराश्यापोटी दोघा तरुणांनी मृत्युला कवटाळल्याने ...
त्र्यंबकेश्वर पाेलीस ठाणे हद्दीत रोलेट जुगारात लाखो रुपये गमावल्यानंतर कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढल्याने आलेल्या नैराश्यापोटी दोघा तरुणांनी मृत्युला कवटाळल्याने जिल्ह्यात रोलेट जुगार तत्काळ बंद करण्याची मागणी जोर धरु लागली. या गुन्ह्यात काही दिवसांपुर्वीच ग्रामीण पोलिसांनी संशयित कैलास शहा याच्यासह त्याच्या काही साथीदारांनाही सापळा रचून अटक केली आहे.
संशयितांकडून पोलिसांनी रोलेटसाठी लागणारे, संगणक, युजर्स आयडीसह इतर मुद्देमाल जप्त केला. दरम्यान या संशयितांविरोधात इतर पोलीस ठाण्यांमध्येही ५हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.
तसेच हे गुन्हेगार संघटीत पद्धतीने नाशिक शहरासह जिल्ह्यातदेखील गुन्हे करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. प्रारंभी युवकांना रोलेट जुगारात जादा परताव्याच्या आमीष दाखवून त्यांना जुगारात रक्कम गुंतविण्यास भाग पाडून त्यांना या जुगाराचे व्यसन लावले जाते. एकदा जुगारात रक्कम गमावल्यानंतर पुन्हा प्रोत्साहित करत वेळेप्रसंगी उधारीनेदेखील रोलेट खेळण्याकरिता संबंधितांकडून तरुणांवर दबाव टशकला जात असल्याचेही बाेलले जात आहे.
---इन्फो--
ग्रामिण पोलिसांनी कसली कंबर
रोलेट जुगार चालवत तरुणांना व्यसनाच्या आहारी घेऊन जाणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्यासाठी आता ग्रामीण पोलीसांनी कंबर कसली असून कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे. या गुन्हेगारांवर मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून याबाबत चाचपणी सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यास ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.