खुनाच्या गुन्ह्यातील लोट टोळीवर मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:15 AM2021-04-22T04:15:35+5:302021-04-22T04:15:35+5:30
शहरात गुन्हेगारी कुठल्याही प्रकारे खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पाण्डेय यांनी दिला आहे. त्यांनी मागील चार महिन्यांत मोक्काची ...
शहरात गुन्हेगारी कुठल्याही प्रकारे खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पाण्डेय यांनी दिला आहे. त्यांनी मागील चार महिन्यांत मोक्काची ही तिसरी कारवाई केली आहे. यामुळे सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून म्होरक्या लोणच्या ऊर्फ विशाल सुनील बेनवाल याच्या टोळीने करण राजू लोट यास मारहाण करत आकाश रंजवे यास धारदार हत्याराने भोसकून ठार मारल्याची घटना ८ फेब्रुवारी २०२१ रोजी द्वारकेजवळ घडली होती.
करण लोट त्याची आई, त्याचा भाऊ अर्जुन व मित्र आकाश रंजवे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जीव वाचविण्यासाठी रंजवे पळत असताना त्याचा पाठलाग करून विशाल बेनवाल व त्याचे साथीदार यांनी त्यांच्याकडील हत्यारांनी आकाश रंजवेला भोसकून, करणच्या पाठीवर वार करून जखमी केले होते. रंजवे याच्या खूनप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार यांनी केला. या गुन्ह्याच्या तपासात संशयित हे सातत्याने संघटित होऊन स्वतःच्या फायद्यासाठी व परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी संघटित गुन्हेगारीसाठी टोळी तयार करून कायदा सुव्यवस्था धोक्यात आणत असल्याचे निष्पन्न झाले होते.
---इन्फो--
विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे
या टोळीतील सदस्यांविरोधात भद्रकालीसह नाशिकमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे करण्याचे ठिकाण निश्चित करणे, टोळीतील सदस्यांना पैसे पुरविणे, घातक शस्त्राने खुनाचा प्रयत्न व खून करणे, शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणे, शस्त्राने गंभीर दुखापत करणे, मारहाण करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून गुन्हा करणे, अवैध शस्त्रांचा वापर करत आर्थिक फायद्यासाठी हप्ते गोळा करणे असे विविध गुन्हे दाखल आहेत.
---इन्फो--
यांच्यावर झाली मोक्काची कारवाई
टोळीचा मुख्य सूत्रधार लोणच्या ऊर्फ विशाल सुनील बेनवाल (२४), पवन ईश्वर
टाक (२८), निखिल ईश्वर टाक (२७), सतीश रमेश टाक (३०), मनीष विक्रम डुलगज (२३), हरीश ताराचंद पवार (२८), शिवम किशोर पवार (२४), अभय अशोक बेनवाल (२०), आकाश रमेश टाक (३२) हे प्रमुख तसेच त्यांना गुन्ह्यासाठी मदत करणारे साथीदार टिपू रणधीर पवार, सुमीत अशोक लोट, विनय सुनील बेनवाल, आतिश शरण चव्हाण, ऋतिक शरण चव्हाण, रोहित समशेर चव्हाण, रोहित अशोक लोट, राहुल अशोक लोट, पवन अशोक लोट, चिंटू दिलीप पवार, जिशान शब्बीर शेख व शिवम सुरेश पवार (रा. सर्व महालक्ष्मी चाळ, वडाळानाका) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.