मध्यम सरी दिवसभर कोसळल्या;१५.६ मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 06:38 PM2019-07-27T18:38:05+5:302019-07-27T18:40:37+5:30
शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासांत २३.३ मि.मी पावसाची नोंद झाली होती. या हंगामात अद्याप एकूण ४९६.९ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची माहिती हवामान निरिक्षण केंद्राकडून देण्यात आली.
नाशिक : शहर व परिसरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली. मध्यरात्री पावसाचा वाढलेला जोर शनिवारी (दि.२७) सकाळी साडेअकरा वाजेर्पंत कायम होता. दिवसभरात १५.६ मिमी पावसाची नोंद झाली तर मागील ३२ तासांत शहरात ३९मि.मीपर्यंत पाऊस पडला आहे. सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरला होता.
शहर व परिसरात पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाच्या सरींचा संततधार वर्षावाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. घाटक्षेत्रांमधील परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार व सोमवारी जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या तालुक्यांत मुसळधार तर शहरात मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार शहरात दिवसभर हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरींचा वर्षाव होत होता. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १५.६ मिमी इतका पाऊस पडला. तसेच शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासांत २३.३ मि.मी पावसाची नोंद झाली होती. या हंगामात अद्याप एकूण ४९६.९ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची माहिती हवामान निरिक्षण केंद्राकडून देण्यात आली.
पहाटेपासून सकाळपर्यंत पावसाचा काहीसा जोर कमी होता; मात्र सकाळी साडेआठवाजेपासून पावसाचा जोर चांगला वाढला. मध्यम स्वरूपाच्या सरींचा वर्षाव होऊ लागल्याने तीन तासांत ७.४ मिमी पाऊस नोंदविला गेला. दिवसभरात हा ‘स्पेल’ वगळता सायंकाळपर्यंत पावसाचे प्रमाण तसे कमी राहिले. साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत पावसाने जवळपास उघडीप दिली होती. या कालावधीत केवळ २.६ मिमी पाऊस शहरात झाला. दुपारनंतर पुन्हा जोर वाढल्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५.६ मिमीपर्यंत पाऊस पडला.
वर्दळ मंदावली; वाहतूक सुरळीत
महिन्याचा चौथा शनिवार असल्यामुळे शासकिय कार्यालयांसह बॅँकांना सुटी होती तसेच दिवसभर हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरींचा वर्षाव सुरूच राहिल्याने शहरातील रस्त्यांवर वर्दळ मंदावलेली होती. तसेच वाहतूकीवरही काही प्रमाणा पावसाचा परिणाम झाला; मात्र वाहनांची संख्या कमी राहिल्याने कोंडीला निमंत्रण मिळाले नाही.
गंगापूर धरण ७२ टक्के भरले
गंगापूर धरणाचा जलसाठा ७२ टक्क्यांवर शनिवारी सायंकाळी पोहचला होता. जलपातळी ४ हजार ५४ दलघफूपर्यंत वाढली असून ३४५ दलघफूपर्यंत नव्या स्वरूपात पाण्याची आवक झाली. पाणलोट क्षेत्रात जोर‘धार’ सुरू राहिल्याने साठ्यात वाढ झाली. त्र्यंबकमध्ये सर्वाधिक ११२ तर अंबोलीत ६१ मिमीपर्यंत पाऊस पडला.