शहरात पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 07:27 PM2020-08-05T19:27:00+5:302020-08-05T19:27:19+5:30
शहरातील अशोकस्तंभ, पंचवटी, गंगापूररोड, शरणपुररोड, सीबीएस, मेनरोड, जुने नाशिक आदि भागात पावसाने संध्याकाळी हजेरी लावली.
नाशिक : शहरात बुधवारी (दि.५) सकाळी तसेच संध्याकाळी पावसाच्या सरींचा दमदार वर्षाव झाला. टप्प्याटप्प्याने विविध उपनगरांमध्ये सरी बरसल्या. यामुळे रस्ते ओलेचिंब झाले होते. सकाळी शहराच्या उपनगरांमध्ये तर संध्याकाळी शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभरात ४.७ मिमी इतका पाऊस नोंदविला गेला. शहरात या हंगामात अद्याप केवळ ४७३.८ मिमी इतका पाऊस झाल्याची माहिती पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राने दिली आहे.
जुलै महिन्याच्या ३१ तारखेला १९.२ मिमी इतका पाऊस आठ तासांत पडला होता. तत्पुर्वी ९ जुलै रोजी ५.३ मिमी इतका पाऊस पडला होता. त्यानंतर बुधवारी ४.७ मिमी पावसाची नोंद झाली. एकूणच जुलै महिना शहरासाठी कोरडाठाक गेला. आॅगस्ट उजाडल्यानंतर प्रथमच बुधवारी शहरासह उपनगरांमध्ये अधुनमधुन का होईना कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला. शहरातील अशोकस्तंभ, पंचवटी, गंगापूररोड, शरणपुररोड, सीबीएस, मेनरोड, जुने नाशिक आदि भागात पावसाने संध्याकाळी हजेरी लावली. पावसाच्या मध्यम स्वरूपातील सरींचा वर्षाव पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ झाल्यामुळे रस्त्यांवरील उंचसखल भागात पाणी साचले होते. शहरात दिवसभर ढगाळ हवामान कायम होते. सरींचा वर्षाव झाल्यामुळे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण काहीसे कमी झाले. गुरूवारी (दि.६) हवामान खात्याकडून उत्तर महाराष्टÑात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गंगापूर धरण समुहात जोरदार पाऊस
गंगापूर धरण समुहात बुधवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. गंगापूर धरण परिसरात ३७, गौतमी-३४, अंबोली-५२, त्र्यंबके श्वर-६१, काश्यपी-११ मिमी इतका पाऊस पडला. गंगापूर धरणाचा जलसाठा ५२ टक्के इतका झाला आहे.