आस आधुनिक विकासाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:29 PM2019-12-15T12:29:09+5:302019-12-15T12:29:43+5:30

नाशिक शहराजळील एकमेव रेल्वे स्टेशन म्हणून येथील मालधक्का मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील सर्वाधिक उत्पन्न देणारा म्हणून उदयास आला आणि आजही ते बिरूद घट्ट चिकटलेले आहे. ही किमया घडवण्यात नाशिकरोड परिसरात स्थायिक झालेल्या व्यापारीवर्गाच्या मेहनतीने आणि सचोटीमुळे साध्य झाली.

 The modern development of AAS | आस आधुनिक विकासाची

आस आधुनिक विकासाची

Next

उन्मेश गायधनी

नाशिक शहराजळील एकमेव रेल्वे स्टेशन म्हणून येथील मालधक्का मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील सर्वाधिक उत्पन्न देणारा म्हणून उदयास आला आणि आजही ते बिरूद घट्ट चिकटलेले आहे. ही किमया घडवण्यात नाशिकरोड परिसरात स्थायिक झालेल्या व्यापारीवर्गाच्या मेहनतीने आणि सचोटीमुळे साध्य झाली. रेल्वेमुळे येथील घाऊक बाजारपेठ इतकी वाढली की एकेकाळी निम्म्या राज्यातील धान्याची उलाढाल येथून होत असे. त्याकाळचा व्यापार हे मोठे वैभव होते. होणाऱ्या आर्थिक उलाढालीमुळे नगरपालिकेला चांगले उत्पन्न मिळत असे. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी या वाढीव उत्पन्नाचा सदुपयोग करून मोठ्या प्रमाणात दर्जेदार मूलभूत सुविधा निर्माण केल्या. पर्यायाने नागरिकांचे जीवनमान उंचावले. नगरपालिका क्षेत्रालगतच्या गावांची किरकोळ व्यापाराची बाजारपेठ म्हणून रुजली, त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांचा राबता वाढला.
एखादा माणूस नाशिकरोडला स्थायिक झाला की सहसा तो दुसरीकडे जाण्याचा विचार करत नाही. पिढ्यान्पिढ्या स्थायिक असलेल्या लोकांच्या आपल्या शहराकडून अनेक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण झाल्यावर नाशिकरोडला कायमस्वरूपी स्थायिक होण्याची प्रथा वृद्धिंगत होईल.
नाशिकरोडकरांचे भाग्य चांगले आहे कारण आपली नगरी स्थापन झाली त्याला फार काळ झालेला नाही. नगरपालिका स्थापन होऊन तर केवळ ६०-६५ वर्षच झाले आहेत. एखाद्या शहराचा विचार केला तर हा खूप अल्पकाळ आहे. परिणामी येथील विकास बºयापैकी सुनियोजित आहे. शहराच्या इतर भागाच्या तुलनेत शांतता असल्यामुळे नाशिकरोड प्रगतीच्या वाटेवर आहे.
आॅगस्ट १९८२मध्ये नाशिक महानगरपालिका स्थापन झाली. महानगरपालिकेचे विभाग भौगोलिक रचनेवर केले गेल्यामुळे नाशिकरोडमध्ये प्रामुख्याने ग्रामीण मळे भाग समाविष्ट झाला. त्यामुळे तुलनेने लोकसंख्या कमी असल्यामुळे नगरसेवकांची संख्या कमी झाली. शिवाय नाशिक शहराच्या मध्यापासून नाशिकरोडचे अंतर जास्त असल्याने इतर भागातील नगरसेवक एकवटतात आणि नाशिकरोडची संख्या कमी पडते. परिणामी आपल्याकडे ना महत्त्वाचे प्रकल्प येतात ना निर्णयक्षम पदे मिळतात. परिणामी नाशिकरोडच्या प्रगतीला दृष्ट लागली असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. ना विकास कामे, ना असलेल्या सुविधांची देखभाल त्यामुळे आहे ती परिस्थिती झपाट्यााने खालावली. त्यातही भौगोलिकदृष्ट्या ग्रामीण मळे भाग मोठ्या प्रमाणात असल्याने तेथील मूलभूत सुविधा पुरवता पुरवता अर्थ नियोजन बिघडून गेले. दर्जाहीन इन्फ्रास्ट्रकचर मुळे होते ते लघुउद्योग बंद पडत आहेत आणि कधी नव्हे तो नाशिकरोडकर स्थलांतरित होण्याच्या विचारात आला आहे.
जिल्ह्याचे केंद्रबिंदू नेहमी कलेक्टर आॅफिस अथवा पारंपरिक बाजारपेठ असते. ती दोन्ही स्थळे नाशिकरोडपासून लांब असून, मध्येच सैन्य दलाचे आर्टिलरी सेंटर आणि गांधीनगर प्रेस असल्याने दोन्ही नगरांमधील अंतर जास्त वाटते. या मानसिकतेमुळे आणि कामगारबहुल लोकवस्तीमुळे नाशिकरोडमध्ये उच्च ब्रॅण्डची दुकाने, शोरूम, मल्टिप्लेक्स, मॉल, नाट्यगृह, हॉटेल्स आली नाहीत. आजच्या तरुण पिढीला या गोष्टी खूप खटकतात, त्यांच्या जीवनशैलीशी आपली नगरी जुळवून घेत नाही. परंतु दर्जेदार जीवनशैलीसाठी आवश्यक इतर नैसर्गिक सुविधा मुबलक प्रमाणात असल्याने अजूनपर्यंत त्यांनी स्थलांतरित होण्याचा घाऊक निर्णय घेतलेला नाही. म्हणून त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करून देणारे शहर निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलावी लागतील.
नाशिकरोडचा विकास करायचा असेल तर सन २०३०चा विचार करावा लागेल. किंबहुना त्या दृष्टीने तत्काळ पावले उचलणे सुरू होणे आवश्यक आहे. आपल्या नाशिकरोडचा विकास खालीलप्रमाणे असावा...
१) शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी असलेल्या शाळेतील शिक्षणाचा स्तर उंचवावा लागेल. उच्चशिक्षित तथा प्रशिक्षित शिक्षकांवर अध्यापनाची जबाबदारी सोपवावी लागेल. विद्यमान शाळेतील शिक्षकांना नियमित प्रशिक्षण देणे, त्यांना परदेशात पाठवून तेथील शिक्षणपद्धती शिकण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यानुसार आवश्यक बदल करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शाळेसाठीची आरक्षणे संपादित करून नवीन शाळा सुरू करण्यास विकास आराखड्याने पुरेशी संधी दिली आहे.
२) नाशिकरोडच्या ग्राहकांना उच्च दर्जाचे आणि नवनवीन वस्तू मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय ब्राण्डची दालने उघडणे आवश्यक आहेत. सिंगल आणि मल्टिब्राण्ड दुकाने सुरू व्हावी लागतील. पालिका बाजारची कल्पना राबवताना नवी दिल्लीतील पालिका बाजारचे उदाहरण अनुकारणे गरजेचे आहे. उगीच बिल्डरसारखे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधू नये.
३) आपल्याकडील रहिवासी सदनिका अगदीच सुमार दर्जाच्या आहेत. नाही अंतरराष्ट्रीय तर निदान मुंबई-पुण्यासारख्या स्कीम विकसित होणे क्रमप्राप्त आहेत. गेटेड वसाहती बांधल्या गेल्या तर तेथील रहिवाशांना अगदी पाश्चात्त्य देशात राहिल्याचा भास होईल.
४) नगरपालिका काळातील सार्वजनिक पाणीपुरवठा स्वच्छ आणि २४ तास होता. दारणा नदीवरील जलशुद्धीकरण केंद्राची पुन्हा उभारणी करून हे विनासायास सध्या होऊ शकेल.
५) नाट्यगृहाचा प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित आहे. मागील पंचवार्षिकमध्ये तत्कालीन आमदारांनी पंचवटीतील नाट्यगृहाला चालना दिली. आपल्याला संघटित आवाज उठवून हे साध्य करावे लागेल.
६) करमणुकीसाठी मल्टिप्लेक्स आवश्यक झाले आहे. त्याची निर्मिती करण्यात आपण खूप उशीर केला आहे, तथापि अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे तातडीने ते होणे आवश्यक आहे.
७) पंधरा - वीस वर्षांपूर्वी आपल्याकडे क्र ीडा संस्कृती होती, पण ती आता लोप पावली आहे. पुनश्च: एकदा क्रीडावैभव प्राप्त करण्यासाठी मोठमोठे मैदाने तयार करणे हिताचे आहे. विविध खेळांचे अत्याधुनिक प्रशिक्षण नियमितपणे आयोजित करावे लागेल. नवीन आरक्षित जागा अधिग्रहित करून क्रीडांगणे विकसित करावेत.
८) पादचाऱ्यांना सुरक्षित चालता येण्यासाठी पदपथ अतिक्रमण मुक्त असणे हा घटनेने दिलेला नागरी मूलभूत हक्क आहे. तो देण्याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेची आहे. तसे झाल्यास पायी चालण्याचे प्रमाण वाढेल आणि चेन स्रॅचिंगला आळा बसेल.
९) नाशिकरोडचे स्वरूप बकाल झाले आहे. कारण एक तर वारेमाप अतिक्रमणे आणि दुसरे म्हणजे परप्रांतीयांनी भरलेल्या झोपडपट्ट्या या जटिल समस्येतून मार्ग काढण्यासाठी मतांचे राजकारण बाजूला सारावे लागेल. ११) शहरात किरकोळ भाजी विक्र ीसाठी सोयीस्कर जागा उपलब्ध नाही, परिणामी विक्रे ते रस्त्यावर बसून व्यवसाय करतात. तेथील ग्राहक आपले वाहने त्याच रस्त्यावर उभी करतात म्हणून वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच झाली आहे. विकास आराखड्यातील भाजी मार्केटची आरक्षणे संपादित करून तेथे बाजार स्थलांतरित करून शहराच्या सौंदर्यात भर घालणे आवश्यक आहे.
१२) नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी महानगरपालिकेने जागा निश्चित करून सुपर स्पेशालिटी दवाखाने व रुग्णालये स्थापन करावीत.
१३) पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अधिकाधिक वृक्षारोपण करून झाडे जगवली पाहिजे. स्थानिक वातावरणात विनासायास वाढणारी झाडेच लावावी, जेणेकरून आपल्याकडचे प्राणवायूचे प्रमाण वाढेल.
वरील उपाय प्रामाणिकपणे केल्यास २०३०पर्यंत नाशिकरोड आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थान होईल याची खात्री आहे. आपल्याकडे साधन सामग्री आहे, निसर्गाची कृपा आहे, आता केवळ इच्छाशक्ती पाहिजे.

Web Title:  The modern development of AAS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक