बागलाण परिसरात आधुनिक शेतीची कास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2016 11:09 PM2016-03-14T23:09:16+5:302016-03-15T00:24:52+5:30
बागलाण परिसरात आधुनिक शेतीची कास
कंधाणे : आरम नदीचा वरदहस्त लाभलेला व एकेकाळी सुजलाम् सुफलाम् समजला जाणार बागलाणचा पश्चिमपट्टा. बेभरवशाचे पर्जन्यमान, शेती सिंचनाच्या अपुऱ्या सोयी-सुविधा, लोकप्रतिनिधींनी केलेला काणाडोळा यामुळे हा भाग उजाड माळरानाकडे वाटचाल करू लागला आहे.
अपुऱ्या सिंचन व्यवस्थेमुळे शेती सिंचनाचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू लागला आहे. गरज ही शोधाची जननी असते. या युक्तीप्रमाणे कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे परिसरातील बळीराजाचा कल वाढला असून, कल्पनेला विचारांची झालरची जोड देत या भागातील शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरली आहे. पारंपरिक शेतीला सोडचिठ्ठी देत आधुनिक टेक्नॉलॉजीमार्फत शेती करताना बळीराजा दिसून येत आहे.
परिसरातील बळीराजाचा कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे कल वाढला असून, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठिबक सिंचन योजना दोन वर्षांपासून प्रभावीपणे राबवली जात आहे. भाजीपाल्याची शेती या भागाचा आर्थिक कणा समजली जाऊ लागली आहे. सततच्या दुष्काळामुळे येथील शेती सिंचनाचा प्रश्न दिवसेंदिवस ऊग्र रूप धारण करू लागला आहे. ७० ते ८० फूट विहिरी आजमितीस १२० ते १३० फूट खोल गेल्या आहेत. भूगर्भातील जलसाठा घटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. चार-पाच वर्षांचा इतिहास पाहता विहिर काम करताना अनेक बळीराजांना आपला जीव गमवावा लागला आहे. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार या युक्तीप्रमाणे बळीराजाने विहीर कामाला स्थगिती दिली. आता प्रपंचाचा गाडा चालवावा कसा, या विचारात बळीराजा असताना काही शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरून याचा प्रयोग केला. आज सर्वच शेतकरी कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या साधनांचा वापर करताना दिसून येत आहे. यासाठी शासनाच्या कृषी विभागाने मोलाची भर घातली आहे. ठिबक सिंचन योजनेला अनुदान हा मैलाचा परीस ठरला. यासाठी जनजागृती करून शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना समजाविण्यासाठी विभागीय कृषी सहायक योगेश बोरसे, कांबळे, गायकवाड, तालुका कृषी अधिकारी विटनोर यांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले आहे. (वार्ताहर)