शहरात आधुनिक वाहनतळाची योजना
By admin | Published: June 30, 2017 12:56 AM2017-06-30T00:56:24+5:302017-06-30T00:56:36+5:30
आधुनिक ‘पे अॅण्ड पार्क’साठी ४० ठिकाणी सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधा पुरविण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेमार्फत शहरात इंटिग्रेटेड पार्किंग सिस्टम राबविण्यात येणार असून, त्याची सुरुवात म्हणून आधुनिक ‘पे अॅण्ड पार्क’साठी ४० ठिकाणी सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधा पुरविण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली.
स्थायी समितीच्या बैठकीत जादा विषयात ‘पे अॅण्ड पार्क’साठी पायाभूत सुविधा पुरविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी, शहर अभियंता उत्तम पवार यांनी सांगितले, शहरात महापालिकेमार्फत इंटिग्रेटेड पार्किंग सिस्टम राबविण्यात येणार आहे. आधुनिक पद्धतीने वाहनतळ उभारण्याची योजना असून, त्याचा आराखडा तयार आहे. त्यात ३४ ठिकाणी रस्त्यांलगत तर ६ ठिकाणी रस्त्याच्या बाजूला वाहनतळ साकारण्याचे नियोजन आहे. सदर पार्किंग व्यवस्थेचे नियंत्रण एकाच एजन्सीमार्फत व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विभागनिहाय मोबाइल अॅपद्वारे वाहनतळाचे नियंत्रण केले जाणार आहे. कॅशलेस पेमेंटची व्यवस्था असणार आहे. सदर आधुनिक वाहनतळाची योजना करताना महापालिकेला अगोदर त्याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी सभापतींनी शहराचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने प्रस्तावाला मान्यता दिली. बैठकीत चार प्रभाग सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती, विरोधी पक्षनेता, सभागृहनेता यांच्यासह विधी, आरोग्य व शहर सुधार समिती यांचे सभापती यांच्याकरिता वाहने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला सभापतींनी मंजुरी दिली. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स उपस्थित राहत नसल्याबद्दल सभापतींनी गंभीर दखल घेत वैद्यकीय विभागाला त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले शिवाय, मनपा सेवेत असूनही खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाईचे संकेत दिले.