मोदी यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरेंचे मिशन युथ, नाशिकसह जळगाव जिल्हा दौऱ्यावर
By संजय पाठक | Published: February 12, 2024 06:30 PM2024-02-12T18:30:01+5:302024-02-12T18:30:38+5:30
येत्या बुधवारी (दि.१४) आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असून तीन ठिकाणी त्यांच्या संवाद सभा होतील.
नाशिक - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात नाशिकमध्ये युवा महोत्सवाचे उदघाटन करून मिशन युथ सुरू केले होते. आता त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने देखील युवा वर्गाला साद घालण्यासाठी मिशन युथ सुरू केले आहे. येत्या बुधवारी (दि.१४) आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असून तीन ठिकाणी त्यांच्या संवाद सभा होतील.
नाशिकहून ते जळगाव येथे जाणार असून तेथेही तीन सभा ते घेणार आहेत. निवडणूकीत युवा मतदार मोठ्या प्रमाणात असून त्यामुळेच युवा मतदारांशी जवळीक तयार करण्यासाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युवा महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी साद घातली होती. त्यानंतर ठाकरे गटाचे शिबीर नाशिकमध्ये पार पडले हेाते. आता ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे युवकांना साद घालण्यासाठी नाशिकपासून दौरा सुरू करणार आहेत.
बुधवारी (दि.१४) ते दुपारी १ वाजता नाशिक जिल्ह्यात इगतपुरी येथे पोहोचणा असून तेथे त्यांचा संवाद मेळावा होईल त्यानंतर दुपारी ३.३० वाजता सिन्नर येथे मेळावा होईल तर सायंकाळी ५ वाजता नाशिकरोड येथील जेलरोड संत ज्ञानेश्वर नगर मैदान येथे युवा संवाद मेळावा होणार आहे.