कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:12 AM2021-05-31T04:12:28+5:302021-05-31T04:12:28+5:30
नाशिक: देशात कोरोना महामारी असतानाही केंद्रातील भाजप सरकार बेफिकिरीने वागल्यामुळेच देशात कोरोनाचा उद्रेक झाला. केंद्र सरकार याबाबत कुठेही ...
नाशिक: देशात कोरोना महामारी असतानाही केंद्रातील भाजप सरकार बेफिकिरीने वागल्यामुळेच देशात कोरोनाचा उद्रेक झाला. केंद्र सरकार याबाबत कुठेही गंभीर दिसले नाही त्यामुळे कोरोनाचे संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले असा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. गंगेच्या पात्रात शव वाहत असल्याचे पाप हे मोदी सरकारचेच असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
केंद्र सरकारला सात वर्ष झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसच्या वतीने रविवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्या अनुषंगाने नाशिकमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. यावेळी आयेाजित पत्रकार परिषदेत थोरात यांनी मोदी सरकारवर चैाफेर टीका केली. कोरोनाच्या संकट काळात केंद्र सरकार कुठेही गंभीर दिसले नाही त्यामुळे देशात कोरोनाची भयावह परिस्थिती निर्माण झाली असे थोरात म्हणाले. गेल्या सात वर्षाच्या काळात मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली ती पूर्ण करण्यात आलेली नाही. पंधरा लाख रूपये खात्यावर जमा करू, परदेशातील काळा पैसा भारतात आणू या आश्वासनांचे काय झाले असा प्रश्नही थोरात यांनी उपस्थित केला.
देशातील महागाईने जनता त्रस्त आहे. पेट्रोल शंभरीपार झाले आहे तर सिलिंडरचे भाव नऊशेपर्यंत पोहोचले आहेत. खाद्य तेलही २०० रूपयांवर पोहोचले आहे. मोदी सरकारच्या काळात महागाईने उच्चांक गाठला असल्याचे थोरात यांनी सांगितले. कामगार विरोधी कायद्यात कामगारांचा नाही तर मालकांचा विचार करण्यात आला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न केला गेला, असा आरोपही यावेळी त्यांनी केला. कोरोनाच्या संकटाची अगोदरच काळजी घ्यावी असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुचविले होते त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. थाळ्या-टाळ्या वाजविणे, दिवे लावणे हा उपाय नव्हताच असेही थोरात म्हणाले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेलाही केंद्र सरकारच जबाबदार असून कोणतीही लस नसताना केंद्राने कोणत्या आधारावर लसीकरणाचा महोत्सव जाहीर केला असा सवाल यावेळी उपस्थित केला. स्वत:ची प्रतिमा मोठी करण्यासाठी मोदींनी इतर देशांना लस पुरविल्याचा आरोप यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
--इन्फो--
भाजपा महाराष्ट्र विरोधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये जाऊन चक्रीवादळाचा दौरा केला. त्यांनी हेलिकॉप्टरमधून गुजरात मधील परिस्थितीची पाहणी केली. मात्र महाराष्ट्रात येण्यास त्यांना वेळ नव्हता. महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी मोंदींना याबाबत विचारले पाहिजे असे सांगून महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांचा यातून महाराष्ट्र द्वेष दिसतो असा घणाघाती आरोपही थोरात यांनी यावेळी केला.