मोदींच्या कारकिर्दीत विकास शून्य
By admin | Published: August 1, 2016 01:19 AM2016-08-01T01:19:52+5:302016-08-01T01:20:03+5:30
श्याम काळे : आयटकच्या जिल्हा अधिवेशनात सरकारवर टीका
नाशिक : देशातील जनतेला गुजरात मॉडेल आणि विकासाचे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारला दोन वर्षांत विकासाच्या दृष्टीने काहीही करता आले नसून या सरकारमुळे केवळ अंबानी व अदानी यांच्यासारख्या उद्योजकांचाच विकास झाला असल्याचा आरोप करीत आयटकचे राज्य सरचिणीस श्याम काळे यांनी राज्य सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.
द्वारका परिसरातीलकॉ. दत्ता देशमुख सभागृहात आयटकच्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा आयटक अध्यक्ष दत्ता निकम, प्रमुख पाहुणे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्ष सुनंदा जरांडे, इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघ सरचिटणीस जगदीश गोडसे, स्वागताध्यक्ष व्ही. डी. धनवटे, राजू देसले, ज्योती नटराजन, सचिन पाटील, संगीता उदमले, सुनीता शर्मा, बाबासाहेब कदम, माया घोलप उपस्थित होते. याप्रसंगी काळे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारचे धोरण कामगार विरोधी आहे. सरकारकडून कामगारांच्या मागण्या व समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. कामगारांना त्यांचे अधिकार मिळत नसल्याने रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून, त्यासाठी आयटक २ सप्टेंबर रोजी राष्ट्रव्यापी संप करणार आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १ आॅगस्टला आयटकचे सभासद रस्त्यावर उतरून जेलभरो आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकार हे धनदांडग्या उद्योजकांसाठी काम करीत आहे. सर्व सामान्यांच्या प्रश्नांविषयी सरकार गंभीर नाही. त्यामुळे देशातील संघटित व असंघटित कामगार विविध समस्यांनी ग्रासला असताना कामगारांच्या हक्कांसाठी संघटनेने अंतर्गत त्रूटी दूर करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी राजू देसले यांनी जिल्हा संघटनेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. प्रास्ताविक व्ही. डी. धनवटे यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. राजपाल शिंदे यांनी केले, तर ओंकार जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)