मोदींच्या दरबारी तिऱ्हळची सुकन्या विराजमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:57+5:302021-07-08T04:11:57+5:30
डॉ. भारती पवार यांचा प्रवास तसा संघर्षमय राहिलेला आहे. लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरपले. या परिस्थितीत आई शांताबाई बागूल यांनी ...
डॉ. भारती पवार यांचा प्रवास तसा संघर्षमय राहिलेला आहे. लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरपले. या परिस्थितीत आई शांताबाई बागूल यांनी काबाडकष्ट करून भारती पवारांसह आपल्या मुलांना शिकवले. प्रतिकूल परिस्थितीत भारती पवार यांनी एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. शिक्षण सुरू असतानाच तत्कालीन आमदार व माजी मंत्री स्व. ए .टी. पवार यांचे द्वितीय चिरंजीव प्रवीण पवार यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. डॉ. पवारांच्या दोन्ही आजोळचे नातलग ए. टी. पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात. पवार कुटुंबाची सून झाल्यानंतर ए. टी. पवारांनी पुढील शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहित केले. मात्र, त्यावेळी राजकीय घराणे असतानाही त्या राजकारणापासून दूर होत्या. तर स्व. ए. टी. पवार यांचे थोरले पुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवणचे आमदार नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. जयश्री पवार हे दाम्पत्यच कळवण तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होते. अभियंता असलेले द्वितीय चिरंजीव प्रवीण पवार हे उद्योग व व्यवसायात होते. परंतु वडिलांच्या प्रत्येक निवडणुकीची जबाबदारी ते स्वत: पेलायचे. दरम्यान, प्रवीण पवार व डॉ. भारती पवार यांना काही एटी समर्थकांकडून राजकारणात सक्रिय करण्याची पावले त्याकाळी उचलली गेली. सन २०१२ च्या नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीत प्रवीण पवार यांच्या नावाची देवळा गटातून चर्चा असताना ऐनवेळी त्यांना माघार घेऊन थांबविण्यात आले होते मात्र उमराणे गटातून डॉ. भारती पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देऊन प्रवीण पवारांची नाराजी दूर केली. भारती पवार या विजयी झाल्या आणि तेथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. सामाजिक व राजकीय बाळकडू त्यांना पवार कुटुंबातूनच मिळाले. पुढे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तत्कालीन आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, तत्कालीन आमदार स्व. ए. टी. पवार, जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा सौ. जयश्री पवार यांच्या नावाची चर्चा होती. ए .टी. पवार यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने सौ. जयश्री पवारांनी उमेदवारी नाकारली तर स्व. ए..टी. पवारांच्या आजारपणाचे कारण पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेसने, लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात डॉ. भारती पवारांना उमेदवारी देऊन नवीन चेहरा मतदारांपुढे आणला. मात्र मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. त्याच भारती पवार यांना २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली आणि भाजपने त्यांना उमेदवारी देत थेट दिल्लीत धाडले. गेल्या दोन वर्षांच्या कारकिर्दीतच भारती पवार यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आणि त्याचे फलित म्हणून आज त्यांची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली.
इन्फो
श्वसुरांचे स्वप्न स्नुषेने केले पूर्ण
सन १९७१ मध्ये काँग्रेस दुभंगल्यानंतर राष्ट्रपतींच्या सल्ल्याने काँग्रेसने मुदतपूर्व निवडणुका घेतल्या. कळवणचा समावेश मालेगाव मतदार संघात असल्याने काँग्रेसने तत्कालीन खासदार झेड. एम. काहांडोळ यांना उमेदवारी दिली तर भारतीय क्रांती दलाकडून ए. टी. पवार यांना उमेदवारी देण्यात आली. इंदिरा गांधींच्या झंझावातापुढे विरोधकांचे पानिपत झाल्याने ए. टी. पवार पराभूत झाले. ए. टी. पवार यांचे दिल्ली गाठण्याचे स्वप्न २०१९ मध्ये स्नुषा डॉ. भारती पवार यांनी ४८ वर्षांनी पूर्ण केले. राज्याच्या राजकारणात सक्रिय राहिलेल्या ए. टी. पवार यांचा वारसा आता दिल्लीच्या राजकारणातही पुढे नेणाऱ्या भारती पवार यांनी जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदारानंतर आता पहिल्या केंद्रीय मंत्रिपदाचा मान मिळवला आहे.
इन्फो
यशवंतरावांनंतर मंत्रिपद
१९६२ मध्ये भारत-चीन सीमावाद पेटला असता त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांना संरक्षणमंत्रिपदी विराजमान करण्यात आले. त्यावेळी गो. ह. देशपांडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत यशवंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आणि नाशिककरांनी यशवंतरावांना बिनविरोध निवडून दिले. त्यावेळी नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिपदाचा मान मिळाला होता. त्यानंतर मागील लोकसभा काळात धुळेचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या रूपाने मालेगाव आणि बागलाण या दोन तालुक्यांना केंद्रीय मंत्रिपदाचा मान लाभला. परंतु जिल्ह्याच्या भूमिपुत्राला पहिल्यांदाच केंद्रात मंत्रिपदाचे मानाचे पान भारती पवार यांच्या रूपाने लाभले आहे.
फोटो- ०७ भारती पवार
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वत:लाच मतदानासाठी रांगेत उभ्या राहणाऱ्या डॉ. भारती पवार यांना थेट दिल्लीत मंत्रिपदाच्या रांगेत स्थान मिळाले.
070721\07nsk_31_07072021_13.jpg
फोटो- ०७ भारती पवारसन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वत:लाच मतदानासाठी रांगेत उभ्या राहणाऱ्या डॉ. भारती पवार यांना थेट दिल्लीत मंत्रीपदाच्या रांगेत स्थान मिळाले.