मोदींच्या सभेत सुरक्षाव्यवस्थेचा अतिरेक; काळे कपडे, बाटल्या, कंगव्यांनाही बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:04 AM2019-04-23T01:04:13+5:302019-04-23T01:05:01+5:30
कांदाप्रश्नी शेतकऱ्यांच्या असलेल्या नाराजीतून आंदोलन होण्याची शक्यता, मैदानावर साप निघण्याची भीती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षाव्यवस्थेविषयी काळजीतून सोमवारच्या पिंपळगाव बसवंत येथील जाहीर सभेत सुरक्षाव्यवस्थेने अतिरेक केला.
नाशिक : कांदाप्रश्नी शेतकऱ्यांच्या असलेल्या नाराजीतून आंदोलन होण्याची शक्यता, मैदानावर साप निघण्याची भीती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षाव्यवस्थेविषयी काळजीतून सोमवारच्या पिंपळगाव बसवंत येथील जाहीर सभेत सुरक्षाव्यवस्थेने अतिरेक केला. डोक्यावर कडक उन्हाचा मारा झेलत मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेल्यांना तब्बल दोन ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागली तर पाण्याच्या बाटल्या, महिलांची पर्स, पिशव्यांना बंदी घालण्यात आल्याने अनेकांना पाण्यावाचून शिक्षा करण्यात आली. काळे कपडे, टोप्यांना मज्जाव करून श्रोत्यांच्या खिशातील कंगवा, तंबाखू, चुन्याची डबी, बडीशोपच्या पुड्याही सुरक्षा दलाने बाहेर फेकून दिल्या. सुरक्षाव्यवस्थेच्या या अतिरेकाने श्रोत्यांना सभा सुरू होण्यापूर्वी व आटोपल्यानंतरही प्रचंड मनस्ताप भोगावा लागला.
युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगावी सभा घेण्याचे निश्चित करण्यात आल्यानंतर जागेचा शोध सुरू झाला. जोपूळ रस्त्यावर बाजार समितीच्या मोकळ्या जागेवर सभास्थळ निवडण्यात आले. परंतु याठिंकाणी मोठ्या प्रमाणावर गवत असल्यामुळे साप, नागांचा वावर आयोजकांसाठी डोकेदुखी ठरला. त्यातून मग सर्पमित्र, वनरक्षक तैनात करण्यात आले, तर शेतकरी आंदोलनाची भीती असल्याने शेतकऱ्यांना नोटिसा देऊन त्यांचा आवाज गप्प करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. सभास्थळी येणाºया प्रत्येक व्यक्तीची तीन ते चार ठिकाणी कसून तपासणी करून सर्व प्रकारच्या वस्तूंना बंदी लादण्यात आली. पेनची तपासणी, मोबाइलची पाहणी, हेल्मेट, कंबरेचा बेल्ट तपासून पाहण्यात आले. महिला, तरुणीदेखील या जाचक तपासणीतून सुटल्या नाहीत. त्यांच्या पर्सदेखील काढून घेण्यात आल्या.
श्रोत्यांना मसाले भाताची मेजवानी
सभेसाठी धुळे, मालेगाव, कळवण, पेठ, सुरगाणा, चांदवड, नाशिक आदी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गाड्या भरून कार्यकर्त्यांना आणण्यात आले. सकाळी ७ वाजेपासून घर सोडलेल्या कार्यकर्त्यांना सभा आटोपल्यानंतर वाहनपार्किंगच्या ठिकाणी मसाले भात, थंड पाण्याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली. ते घेण्यासाठी झुंबड उडाली, परंतु खाण्यासाठी कोणताही आडोसा नसल्याने काहींनी तप्त जमिनीवरच ठाण मांडून मसाले भातावर ताव मारला.
वाहनांची गर्दी होणार असल्याने जोपूळ रस्त्यावर सहा ते सात ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सभास्थळ गाठण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागली. मात्र सभा सुटल्यानंतर अनेकांना आपले वाहनच सापडत नसल्याने अनेकांची धावपळ उडाली.
जामर लावल्यामुळे भ्रमणध्वनीला रेंज मिळत नसल्याचा फटका सभेसाठी आलेल्या सर्वांनाच बसला. सभा संपल्यानंतरही सुमारे अर्धा ते पाऊण तास भ्रमणध्वनी हॅँग होते.