मोहाडी गटात चौरंगी लढत

By admin | Published: February 16, 2017 12:18 AM2017-02-16T00:18:20+5:302017-02-16T00:18:31+5:30

राष्ट्रवादीसमोर बंडखोरांचे आव्हान : शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला

The Mohali group has won four quarters | मोहाडी गटात चौरंगी लढत

मोहाडी गटात चौरंगी लढत

Next

 भगवान गायकवाड दिंडोरी
दिंडोरी नगरपंचायत झाल्याने गटाची फेररचना होत नव्याने उदयास आलेला मोहाडी गट हा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव असून, या गटात शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजपा व कॉँग्रेस अशी चौरंगी लढत होत आहे. उमेदवार जरी राखीव प्रवर्गातील असले तरी खुल्या वर्गातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. विद्यमान जि.प. सदस्य शिवसेनेचे गटनेते प्रवीण जाधव व त्यांचे परंपरागत विरोधक कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी यांच्या गटात वर्चस्वाची लढाई रंगत असताना शिवसेनेची उमेदवारी न मिळालेल्या तुकाराम जोंधळे या शिवसैनिकाने भाजपात प्रवेश करत काटशह दिल्याने शिवसेनेला आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी भाजपा सोबतच कॉँग्रेस राष्ट्रवादीच्या
कडव्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे.
मोहाडी गटात पूर्वी शेकापचे तर मध्यंतरी काँग्रेसपुढे राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व ठेवले. मात्र गेल्या निवडणुकीत शिवसेनेने शेकापचे नेते एकनाथ जाधव यांचे पुत्र प्रवीण जाधव यांना उतरवत राष्ट्रवादीला धोबीपछाड देत शिवसेनेचा भगवा फडकावला. प्रवीण जाधव जिल्हा परिषदेत शिवसेनेचे गटनेते झाले. त्यांनी या गटात आपली मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा गट अनुसूचित जमाती महिला यासाठी राखीव झाल्याने त्यांची पुन्हा जिल्हा परिषदेत जाण्याची संधी हुकली आहे. मात्र त्यांनी गटात शिवसेनेची सत्ता कायम राखण्यासाठी आपल्या सहकारी शिवसैनिकांशी पंगा घेत मोहाडी गावातील सारिका नेहरे यांना उमेदवारी देत तिकिटाची पक्षांतर्गत लढाई जिंकली आहे.
तुकाराम जोंधळे यांनी भाजपामध्ये प्रवेश करत भारती जोंधळे यांना उमेदवारी देत शिवसेनेला काटशह दिला आहे. प्रवीण जाधव यांना शह देण्यासाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादीने एकास एक उमेदवार देण्याची रणनीती आखत भारती जोंधळे यांना उमेदवारी देऊ केली. मात्र त्यांनी सत्ताधारी भाजपाला आपलेसे केल्यानंतर कॉँग्रेस व राष्ट्रवादीनेही स्वतंत्र उमेदवार देत मागील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी रणनीती आखली
आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसने मोहाडी येथील मीना पोटिंदे यांना उमेदवारी देत शिवसेनेपुढे आव्हान उभे करताना मोहाडी गणात जानोरी येथील, तर पालखेड गणात उच्चशिक्षित महिलेला मैदानात उतरवले आहे. कॉँग्रेसने गटात जानोरीच्या कमल केंग यांना उमेदवारी दिली असून, गणातही जानोरी गावाचे तर पालखेड गणात पालखेडचा उमेदवार देत रणनीती आखली आहे. विधानसभा निवडणुकीत माजी आमदार रामदास चारोस्कर यांना या गटात मिळालेल्या मतांवर कॉँग्रेसची मदार आहे; मात्र बदलत्या राजकीय समीकरणांत कॉँग्रेसला येथे आव्हान कायम ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. शिवसेनेची मदार प्रवीण जाधव यांच्यावर राहणार आहे. त्यांनीही मोहाडी गणात जानोरीचा, तर पालखेड गणात पालखेडचा उमेदवार घेत आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. ४राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही गाजावाजा न करता गेल्यावेळी मिळालेली मते जरी यंदा राखली तरी सहज विजय शक्य आहे असे आपल्या कार्यकर्त्यांना पटवत शिस्तबद्ध प्रचार करत गेल्यावेळी निसटता झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची रणनीती आखली आहे. भाजपाची मदारही जोंधळे यांच्यावर आहे. जोंधळे यांच्या शिवसैनिक, मित्रपरिवार त्यांची एकगठ्ठा मते भाजपाच्या पदरात पडावी या विचाराचे भाजपाने मोहाडी व पालखेड गणात देत रणनीती आखली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेचे प्रवीण जाधव यांच्या झंझावातापुढे एकतर्फी लढतीचे निर्माण झालेले चित्र तुकाराम जोंधळे यांच्या बंडाने राष्ट्रवादीला उभारी देणारे ठरले असून, शिवसेनेला आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी स्वकीयांच्या बंडाचा सामना करत राष्ट्रवादीचे आव्हान पेलावे लागणार आहे.

Web Title: The Mohali group has won four quarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.