मोहरम पारंपारिक पद्धतीने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:46 PM2017-10-01T23:46:52+5:302017-10-02T00:08:21+5:30
मालेगाव येथील मुस्लिम बांधवांतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत पारंपारिक पद्धतीने मोहरम साजरा करण्यात येत आहे.
आझादनगर : मालेगाव येथील मुस्लिम बांधवांतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत पारंपारिक पद्धतीने मोहरम साजरा करण्यात येत आहे.
मोहरम निमित्ताने शहरातील सुन्नी पंथीय मुस्लिम बांधवांतर्फे ताबुतची प्रतिकृती बनविण्यात येते. या महिन्याच्या ९ तारखेस सायंकाळी (आसिरच्या नमाजनंतर) ताबुत घराबाहेर काढण्यात येतो. या निमित्ताने शहरातील इस्लामपुरा भागातील चांदणी चौकातील सुमारे ७० वर्षापासून चांदीपासून बनविण्यात येणारी चांदीची ताबुत बघण्यासाठी अबालवृद्धांसह महिलावर्गाची मोठी गर्दी झाली होती. १९४७ पासून बनविण्यात येणारी चांदीच्या ताबुत सध्या १५ किलो चांदी व १० तोळे सोने आहेत. त्यामुळे याबद्दल मुस्लिम बांधवांमध्ये विशेष आकर्षण आहे. करबला येथील युद्ध हे सत्य व असत्याचे होते. यजीद नामक बादशाह व त्याच्या आठ हजार सैन्याकडून हजरत इमाम हुसेन व त्यांच्या वंशातील ७२ जणांना वीर मरण आले होते. या करबलाच्या युद्धाबाबत मुस्लिमबांधवांना परिपूर्ण माहिती अवगत व्हावी या उद्देशाने शहरातील सुन्नी इस्लामी, रजा अॅकेडमी, सुन्नि जामेतुल उलमा, सुन्नि जमियत इस्लामसह सुन्नि दावत-ए- इस्लामी संघटनेतर्फे मौलाना सय्यद आमिनुल कादरी हे गेल्या अनेक वर्षापासून शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर सभा घेऊन करबलाची माहिती विशद करतात. मोहरमच्या ११ तारखेस शहरातील ताबुतांचे गिरणा-मोसम संगमावर विसर्जन करण्यात येते. हजरत इमाम हुसेन यांना आलेल्या हुतात्मबद्दल सिया पंथियांकडून शोक व्यक्त करण्यात येतो. यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करुन श्रद्धांजली देण्यात येते. त्यानुसार मोहरमच्या ७ तारखेस सर्व सिया पंथीय बांधवांच्या घरातुन (इच्छेनुसार) मौला अब्बासची हजेरी काढण्यात येते त्यास आलम असे संबोधिले जाते. ९ तारखेस मशिदीमध्ये रात्रभर जागरण करीत प्रबोधन केले जाते. १० तारखेस (यौम-ए-आशुरा) निमित्ताने चंदनपुरी गेट स्थित मुख्य मशिदीपासून आलम व ताबुत निघत सायंकाळी सिया कब्रस्तान पोहचत समारोप केला जातो. यावेळी सिया बांधवांकडून मातम केले जाते. ११ तारखेस रात्री हुसैनी जामा मशिद समोर धगधगत्या विस्तवावरुन चालत पार केले जाते. त्यास आग का मातम असे म्हटले जाते. अशा प्रकारे शहरातील मुस्लिम बांधवांतर्फे मोहरम साजरा करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षापासून धार्मिक मौलानांतर्फे करबलाबाबत करण्यात येत असलेल्या प्रबोधनपर सभांमुळे समाजात धार्मिक जागृती येत गत अनेक वर्षापासून चालत येत असलेल्या चाली-रुढींना मुस्लिम बांधवांकडून फाटा देण्यात येत आहे.