शहर पोलीस आयुक्तालयातील शेख, मोहिते यांना ‘पोलीस पदक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 05:47 PM2019-01-25T17:47:34+5:302019-01-25T17:57:33+5:30
नाशिक : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला शुक्रवारी (दि़२५) पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील ४४ पोलिस अधिकारी- ...
नाशिक : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला शुक्रवारी (दि़२५) पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील ४४ पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यामध्ये समावेश आहे. यावर्षी देशभरातून ३ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक (पीपीएमजी), १४६ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी), ७४ पोलिसांना उत्कृष्ट सेवा ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएमडीएस ) आणि ६३२ पोलिसांना ‘पोलीस पदक’(पीएमएमएस) जाहीर झाली आहेत. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक जाकिर शेख व सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास मोहिते यांना गुणवत्तापूर्ण सेवेबाबत पोलीस पदक जाहीर झाले आहेत़
- जाकिर शेख, पोलीस उपनिरीक्षक, इंदिरानगर
शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जाकिर हुसेन गुलाम हुसेन शेख यांना गुणवत्तापूर्ण सेवेबाबत पोलीस पदक जाहीर झाले आहे़ जाकिर शेख हे १९८५ मध्ये पोलीस दलात भरती झाले होते़ प्रारंभी व्हॉलीबॉल व कराटे प्रशिक्षणामध्ये त्यांनी नैपुण्य प्राप्त केले़ सिन्नर, देवळाली कॅम्प, नाशिकरोड, पंचवटी पोलीस ठाणे तसेच शहर गुन्हे शाखेत कर्तव्य केले़ टिप्पर गँग, इराणी गँग, चोरी, घरफोडीतील सराईतांना त्यांनी अटक करून गुन्हे उघडकीस आणले़ ३३ वर्षाच्या सेवेतील कालावधीत जाकिर शेख यांनी ४५० बक्षीसे मिळविलेली आहेत़
- विलास मोहिते , सहायक पोलीस उपनिरीक्षक, भद्रकाली
भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास रघुनाथ मोहिते यांना गुणवत्तापूर्ण सेवेबाबत पोलीस पदक जाहीर झाले आहे़ १९८३ मध्ये पोलीस शिपाई या पदावर भरती झाले़ मालेगावमधील छावणी पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस उपअधिक्षक कार्यालय, सहायक पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिकरोड पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालय, गुन्हे शाखा, सरकारवाडा, सिंहस्थ शाखा, विज वितरण पोलीस ठाणे व भद्रकाली पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत़ ३६ वर्षांच्या सेवेतील कालावधीत विलास मोहिते यांनी २३० बक्षीसे मिळविलेली आहेत़
पोलीस आयुक्त डॉ़ रविंद्र सिंगल व वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस पदक मिळविणारे जाकिर शेख व विलास मोहिते यांचे अभिनंदन केले आहे़