मोहितेश खूनप्रकरणी मित्रास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:17 AM2019-10-27T00:17:21+5:302019-10-27T00:17:50+5:30
स्वत:चा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी मोहितेशचे त्याच्या ‘रूममेट’ने अपहरण करत त्र्यंबक शिवारात दगडाने ठेचून निघृणपणे खून के ला होता. या गुन्ह्यात आरोपी कुशाल उर्फ आकाश दत्तात्रय प्रभू (१८, रा. वैद्यनगर, द्वारका) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरत जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
नाशिक : स्वत:चा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी मोहितेशचे त्याच्या ‘रूममेट’ने अपहरण करत त्र्यंबक शिवारात दगडाने ठेचून निघृणपणे खून के ला होता. या गुन्ह्यात आरोपी कुशाल उर्फ आकाश दत्तात्रय प्रभू (१८, रा. वैद्यनगर, द्वारका) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरत जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे. आकाश याने त्याच्या एका अल्पवयीन मित्रासोबत संगनमत करून मोहितेशचे अपहरण करत त्याच्या वडिलांकडे २० लाखांची खंडणीची मागणी केली होती. त्याचा अल्पवयीन साथीदारदेखील या गुन्ह्यात दोषी असून, त्याला बाल न्यायालयाने यापूर्वीच शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मूळचा मालेगावचा राहणारा मोहितेश प्रलीन बाविस्कर (१७) हा विद्यार्थी नाशिकला शिक्षण घेण्यासाठी २०१४ साली आला होता. तो त्याच्या मित्रांसमवेत गोळे कॉलनी येथे एका खोलीत राहत होता. या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपीदेखील २०१५ सालापासून येथे खोलीत राहण्यास आला, हे दोघेही बालपणीचे मित्र असल्यामुळे मोहितेश व त्याचा पुन्हा संपर्क वाढला. अल्पवयीन आरोपीसोबत राहणाऱ्या आकाशशीदेखील त्याची मैत्री झाली. अल्पवयीन आरोपी हा बालपणाचा मित्र असल्यामुळे त्याला मोहितेशच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती माहीत होती. त्यामुळे त्याने आरोपी आकाशच्या संगनमताने मोहितेशचे अपहरण करत त्याच्या वडिलांकडून २० लाखांची खंडणी वसुलीचा कट रचला.
१४ आॅक्टोबर २०१५ साली आकाश व त्याच्या अल्पवयीन मित्राने मोहितेशला बोलावून घेत अशोक स्तंभावरून बुलेट दुचाकी (एम.एच.०१ बीएच९५३२)वर बसवून त्यांच्या खोलीवर नेले. तेथे एका पल्सर दुचाकीवर मोहितेशला एका दुकानात नेऊन बाहेर फिरावयास जायचे आहे, असा बनाव केला. यावेळी मोहितेशच्या मोबाइलवर आरोपींनी रिचार्ज करून घेतला. त्यानंतर आकाशने त्याच्या अल्पवयीन आरोपीच्या मदतीने मोहितेशला त्र्यंबकेश्वर शिवारातील सापगाव परिसरात नेले. जव्हार रस्त्यावर या दोघांनी मोहितेशच्या डोक्यात दगड घालून त्यास ठार मारले. त्याचा मृतदेह गणेशगाव शिवारातील एका शेतातील पाटाच्या खाली टाकून दिला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-१चे तत्कालीन सहायक निरीक्षक नागेश मोहिते यांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख व जिल्हा न्यायाधीश आर. एम. जोशी यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी १९ साक्षीदार तपासले. जोशी यांनी साक्षीदारांची साक्ष, परिस्थितीजन्य पुराव्यांच्याआधारे आकाश यास दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
गुन्हे शाखेकडून उलगडा; अवघे शहर हादरले
मोहितेश खून खटल्याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती दिली; मात्र दोघा अल्पवयीन आरोपींनी कुठल्याहीप्रकारे खुनाचा पुरावा मागे राहणार नाही, याची काळजी घेतल्याने पोलिसांच्या हाती धागेदोरे लागत नव्हते. या गुन्ह्याचा तपास सरकारवाडा पोलीस व गुन्हे शाखा युनिट-१कडून समांतरपणे केला जात होता. खुनाचा उलगडा करताना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. मोबाइल संभाषण (सीडीआर) तपासणी करत त्याद्वारे सुगावा शोधून संशयित आरोपींचा माग काढला; मात्र दोघा आरोपींनी खंडणीची मागणी केल्याने मोहितेशच्या जिवाला धोकाही निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांकडून अधिक सतर्कतेने व शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या हालचाली सुरू होत्या. तत्पूर्वीच या दोघांनी मिळून मोहितेशची हत्या करून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते.
...असा केला पुरावा नष्ट
महाविद्यालयात जाण्यापूर्वी दोघा आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मोहितेशला ठार मारताना रक्ताने माखलेले स्वत:च्या अंगावरील कपडे एका पिशवीत भरून नासर्डी नदीच्या काठालगतच्या झाडीझुडुपात फेकून दिले. त्यानंतर काही वेळेसाठी महाविद्यालयात हजेरी लावली. त्यानंतर मोहितेशच्या वडिलांशी संपर्क साधून २० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. त्याचे वडील नाशिकला आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. गोपनीय चौकशीला सामोरे जात दिशाभूलदेखील केली. त्यानंतर मोहितेशचा मोबाइल पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने एका मोकळ्या भूखंडावर फे कून दिला होता.