मोहपाडा-हतगड रस्ता : जीप, दुचाकीची समोरासमोर धडक; पाच जखमी सुरगाण्याजवळ अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:27 PM2018-01-06T23:27:32+5:302018-01-07T00:25:26+5:30
सुरगाणा : चिराई घाटाजवळ रस्त्यावर झालेल्या जीप व दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर दुसºयाचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सुरगाणा : तालुक्याचे प्रवेशद्वार समजले जाणारे चिराई घाटाजवळील मोहपाडा ते हतगड या जोड रस्त्यावर सकाळीच आठ वाजेच्या सुमारास झालेल्या जीप व दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर दुसºयाचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर पाच जण जखमी झाले असून, ते बुबळी येथील रहिवासी आहेत. त्यांची नावे समजू शकली नाहीत. त्यांना बुबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार पांडूरंग चौरे (रा. सुफले दिगर ता. कळवण) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महिंद्रा मॅक्स जीपचालक महेंद्र घुले (राहणार हट्टी) हा एम.एच.१२, बी.पी- ३००२ या जीपमध्ये कांदा लागवडीसाठी काही मजुरांना अभोणा भागात सकाळी घेऊन जात होता. याच रस्त्याने हतगडकडून हिरो होंडा क्रं एम.एच. १५, बी.बी.- १७४० या दुचाकीने सोनीराम मावंजी चौरे ( वय ३५. रा. सुफले दिगर ता. कळवण) व हिराजी मंगळू पवार (वय ५५ रा. मोहपाडा खिराड) हे दोघेही कामानिमित्ताने सुरगाण्याकडे येत होते. त्यांना फरशीच्या वळणावर जीपने जोरदारपणे धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. यास चालक जबाबदार आहे अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मयत सोनीराम चौरे व हिराजी पवार हे सासरे-जावई होते. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. चालक महेंद्र घुले यास अटक केली असून, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, गोतरणे, सहारे, दवंगे आदी तपास करीत आहेत. बोरगाव ते बर्डीपाडा हा दुपदरी रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर आतापर्यंत दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या अपघात अठ्ठावीस ते तीस जण मृत्युमुखी पडले आहेत, तर तीस ते चाळीस जण जखमी होऊन जायबंदी झाले आहेत. या मयतामध्ये विशेषत: अठरा ते पंचवर्षीय तरु णाईचा समावेश आहे. या राज्य महामार्गावर पोलिसांच्या आशीर्वादाने, वरदहस्ताने जागोजागी टपरीवर दमण येथील देशी, विदेशी दारू मिळत आहे. त्यामुळे तरु णाई मद्यधुंद होऊन बेदरकारपणे दुचाकी वाहने चालवत आहेत. याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.