प्रशासन सैराट, जनावरे मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:58 AM2019-07-30T00:58:00+5:302019-07-30T00:58:33+5:30
पावसाळा सुरू झाला आणि मोकाट जनावरे पुन्हा सर्वत्र दिसू लागली आहेत. मोकाट जनावरांमुळे अनेकदा अपघात तर घडतातच, परंतु गेल्यावर्षी तर दोन जणांना जनावरांनी गंभीररीत्या जखमी केले. असा प्रकार असताना प्रशासनाने त्यावेळी चौकशी आणि कारवाईची औपचारिकता पार पाडली
आॅन दीस्पॉट
नाशिक : पावसाळा सुरू झाला आणि मोकाट जनावरे पुन्हा सर्वत्र दिसू लागली आहेत. मोकाट जनावरांमुळे अनेकदा अपघात तर घडतातच, परंतु गेल्यावर्षी तर दोन जणांना जनावरांनी गंभीररीत्या जखमी केले. असा प्रकार असताना प्रशासनाने त्यावेळी चौकशी आणि कारवाईची औपचारिकता पार पाडली आणि नंतर मात्र पुन्हा ‘जैसे थे’ कारभार ठेवल्याने मोकाट जनावरे रस्त्यांवर दिसू लागली आहेत.
शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. गंगा घाटापासून रविवार कारंजा आणि सीबीएस इतकेच नव्हे तर अन्य भागात आणि उपनगरांत नाशिकरोड, सिडको, सातपूर, पंचवटी या भागात मोकाट जनावरे ठाण मांडतात. जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी होते आणि अनेकदा अपघात होतात. एरव्ही अपघात टाळण्यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणा काही तरी केल्यासारखे का होईना कृती करीत असते, परंतु गेल्या काही वर्षांपासून मोकाट जनावरांवर कारवाई करण्याची केवळ चर्चाच होत आहे.
गायी पकडून त्यांच्यावर आणि पर्यायाने संबंधित मालकांवर कारवाई करण्याबाबत मात्र महापालिकेची कृती म्हणजेच बोलाचाच भात... अशा स्वरूपाची असते. ज्या भागात जनावरे मोकाट असतात, ती त्याच परिसरातील पाळीव असतात. परंतु संबंधित त्यांना मोकाट सोडतात, असे सांगितले जाते. परंतु अशांवर महापालिका कारवाई करीत नाही. शिवाय गोठे स्थलांतरित करण्याच्या केवळ घोषणाच होत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी सिडकोत दोन गंभीर घटना घडल्यानंतरही महापालिकेला जाग आली नसून आताही प्रशासन दुर्घटनेची वाट बघत आहे काय? असा प्रश्न केला जातो.
गोठेधारकांच्या विषयावर बोटचेपी भूमिका
शहरातील गोठे शहराबाहेर स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून केवळ चर्चेत आहे. तथापि, बहुतांशी बड्या राजकारणी मंडळींचे गोठे असल्याने आजवर त्यावर महापालिका ठोस भूमिका घेऊ शकलेली नाही. गेल्यावर्षी सर्व गोठेधारकांना नोटिसा बजावून डिसेंबर अखेरीस सर्व गोठे स्थलांतरित करण्याची डेडलाइन होती. परंतु प्रत्यक्षात कोणतेही गोठे शहराबाहेर गेलेले नाही. उलट गोठेधारकांनीच महापालिकेला गोठ्यांसाठी महापालिका हद्दीबाहेर जागा द्या अशाप्रकारची मागणी केली. महापालिकेच्या १९९३ ते १९९५ दरम्यान मंजूर झालेल्या शहर विकास आराखड्यात तबेले, गोठे आणि घास बाजाराची अनेक आरक्षणे होती. मात्र आरक्षित भूखंड ताब्यात घेऊनदेखील कारवाई झालेली नाही. गोेठे स्थलांतर दूरच किमान रस्त्यावरील मोकाट जनावरे आवरण्याची कृतीही महापालिका करू शकलेली नाही.
ठेकेदारी संशयास्पद
महापालिकेने यापूर्वी जनावरे पकडण्याचे ठेके वेळोवेळी दिले आहेत. मात्र सर्वच ठेक्यांचा कारभार संशयास्पद राहिला आहे. विशेषत: जनावरे पकडणे तसेच ते नक्की किती दिवस कोंडवाड्यात होते नंतर कोणत्या गोशाळांना ते देण्यात आले, हा सर्वच प्रकार संशयास्पद असल्याची चर्चा असून, आता त्याचादेखील शोध घेण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेत श्वान पकडण्याचे, त्यानंतर डुकरे आणि मोकाट जनावरे पकडण्याचे अनेक ठेके दिले आहेत, परंतु त्यानंतर त्यावर कारवाई मात्र झालेली नाही.
येथे आढळतात मोकाट जनावरे...
पंचवटी विभाग- पंचवटी कारंजा, बाजार समिती कार्यालय, पांझरपोळसमोर, काट्या मारोती चौकी, तपोवनरोड, दिंडोरीरोड, तारवालानगर, उन्नती शाळा पेठरोड, पाटालगत हिरावाडीरोड, रामकुंड परिसर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण रस्ता, पंचवटी अमरधाम, म्हसरूळ गाव, मखमलाबादरोड.
मध्य नाशिक- रविवार कारंजा, मल्हारखाण परिसर, दहीपूल परिसर, भद्रकाली मार्र्केट, भाजीबाजार भद्रकाली, सारडा सर्कल, गंजमाळ, द्वारका, वडाळारोड, वडाळा पाथर्डीरोड,
सिडको- पवननगर, त्रिमूर्ती चौक, उंटवाडीरोड, पाथर्डी गाव
सातपूर- सातपूर गाव, शिवाजी मंडई, गंगापूर गाव, आनंदवली
नाशिकरोड- मुक्तिधाम, बिटको चौक, जयभवानीरोड, तरण तलाव स्टॉप, दुर्गा उद्यान, सुभाषरोड, देवळाली गाव, सायखेडारोड, नारायण बापूनगर.