भगूर परिसरात सोडले नाशिकमधील मोकाट श्वान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:25 AM2019-09-23T00:25:15+5:302019-09-23T00:25:35+5:30
भगूर शहर आणि देवळाली कॅम्प परिसरात केवळ नाशिक महानगरपालिका कर्मचारी बेवारस मोकाट श्वान बेकायदेशीर सोडत असल्याने त्यांचा त्रास वाढला आहे, तरी महापालिका प्रशासनावर शासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भगूर : भगूर शहर आणि देवळाली कॅम्प परिसरात केवळ नाशिक महानगरपालिका कर्मचारी बेवारस मोकाट श्वान बेकायदेशीर सोडत असल्याने त्यांचा त्रास वाढला आहे, तरी महापालिका प्रशासनावर शासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भगूर शहरात गेल्या अनेक वर्षे मोठ्या प्रमाणात प्रत्येक प्रभागात दररोज मोकाट श्वानांची संख्या वाढत आहे, या श्वानांनी अनेकांना चावा घेऊन घरासमोर घाण करणे, गरिबांच्या पाळीव कोंबड्या फस्त करून शेळ्या-जनावरांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढले असून, भगूर नागरिक हैराण झाले आहे.
दरम्यान, भगूर नगरपालिकेने अनेक वेळा या श्वानांना पकडून सिन्नरघाटात सोडून दिले, तरीही संख्या वाढत असल्याने याचा शोध घेतला असता नाशिक महानगरपालिका कामगार आपल्या हद्दीतील मोकाट श्वान पकडून रात्रीच्या वेळी भगूर देवळाली कॅम्प सीमेवरील भगूर बसस्थानक पाठीमागील जंगल खाणीत गाडीतून आणून सोडतात आणि हे बेवारशी श्वान भगूर देवळाली कॅम्प शहरातील विविध प्रभागांत येतात आणि त्रास देतात. दरम्यान, भगूरच्या काही मोकाट श्वान बंगल्याच्या दारात व प्रांगणात दररोज रात्रीच्या वेळी आडोशाचा आधार घेऊन अनेक भुंकतात व घाण करतात. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांनी हजारो रुपये खर्च करून लोखंडी फाटक लावून पत्रे जोडून जाळी लावली आहे.
अनेक वेळा नाशिक महानगरपालिका अधिकाऱ्यांना तोंडी सांगूनही दखल घेतली जात नाही तरी लवकरच भगूर नगरपालिकेच्या वतीने कारवाईचा ठराव करून शासनाकडे पाठवला जाणार असून, दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा ईशारा नागरिकांनी दिला आहे.