मोकाट कुत्र्यांनी ग्रामीण भागातील ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:14 AM2021-01-22T04:14:08+5:302021-01-22T04:14:08+5:30
एकलहरे : नाशिक महानगराजवळील ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, या कुत्र्यांकडून नागरिकांना त्रास तर सोसावा लागतोच, ...
एकलहरे : नाशिक महानगराजवळील ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, या कुत्र्यांकडून नागरिकांना त्रास तर सोसावा लागतोच, परंतु त्यांच्याकडून शेतीपिकांचे नुकसानही केले जात असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नाशिक महापालिका हद्दीतील मोकाट कुत्रे तालुक्याच्या ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी सोडून दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नाशिक महापालिका हद्दीला लागून असलेल्या पळसे गावातील नासाका साइट, गिरणारे महादेवपूर रस्ता, खादी ग्रामविकास विद्यामंदिर, माडसांगवी टोलनाका, भगुरजवळील बार्न्स स्कूल रोडवरील इदगाह परिसर, एकलहरे येथील पेट्रोलपंपाजवळ, गंगावऱ्हे गावाजवळ, पिंप्रीसिद्ध येथील हिंदुस्ताननगर येथे तसेच विल्होळी जकातनाका व खत प्रकल्पाजवळ रात्रीच्या वेळी महापालिकेचे कर्मचारी शहरातील मोकाट पकडलेले कुत्रे आणून सोडतात. त्यामुळे हे कुत्रे शेतात झुंंडीने शिरून भाजीपाला पिकांची नासधूस करतात. प्रसंगी शेतकऱ्यांच्या पशुधनावरही हल्ला करून जखमी करतात. रात्रीबेरात्री मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा पाठलाग करीत असल्यामुळे अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्याने जावे लागते. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत असून, लवकरच महापालिका आयुक्तांना भेटण्याची चळवळ सोशल माध्यमातून सुरू झाली आहे. (फोटो २१ डॉग)