दरोड्याच्या सूत्रधारासह टोळीवर मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 01:25 AM2019-08-26T01:25:32+5:302019-08-26T01:25:49+5:30
उंटवाडी रोडवरील मधुरा टॉवरमधील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांसह टोळीचा मुख्य सूत्रधार व दरोडेखोरांना मदत करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने अखेर ‘मोक्का’अन्वये कारवाई केली आहे.
नाशिक : उंटवाडी रोडवरील मधुरा टॉवरमधील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांसह टोळीचा मुख्य सूत्रधार व दरोडेखोरांना मदत करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने अखेर ‘मोक्का’अन्वये कारवाई केली आहे. यामध्ये १५ संशयित आरोपींचा समावेश आहे. या टोळीने संघटितपणे कट रचून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कार्यालयात दरोडा टाकला. यावेळी प्रतिकार करणाºया कर्मचाºयास गोळ्या झाडून ठार मारण्यात आल्याचेही तपासात उघडकीस आले आहे.
मुथूट फायनान्सच्या कार्यालयात १४ जून २०१९ रोजी सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. मात्र कार्यालयातील धाडसी कर्मचारी साजू सॅम्युअल याने केलेल्या विरोधामुळे आणि दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे दरोडेखोरांचा सोने लुटीचा प्रयत्न पूर्णपणे फसला. यावेळी दरोडेखोरांनी साजूवर केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. शहर पोलिसांनी तपास करून गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश राज्यातून संशयित जितेंद्रसिंग विजय बहादूर सिंग राजपूत (३४, गुजरात), परमेंदर उर्फ गौरवसिंग राजेंद्रसिंह (३१, रा. सुरत, ), आकाशसिंग विजय बहादूर सिंग राजपुत (३०, रा. उत्तर प्रदेश) यांना अटक केली. त्यांच्याकडील चौकशीतून दरोड्याचा कट रचणारा मास्टरमाइंड सुबोधसिंह ईश्वरीप्रसाद सिंह (३५, रा. बिहार) हा असल्याचे उघड झाले. त्यानुसार संशयित दरोडेखोर व त्यांना मदत करणाºयांवर मोक्कानुसार कारवाई केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त समीर शेख हे करीत आहेत.
सुबोधसिंह सध्या बिहार येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे. तसेच त्यांचे अन्य आठ संशयितांचीही नावे पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. दरोडेखोरांनी पूर्वनियोजित कट रचून संघटितपणे हा दरोडा टाकल्याचे उघडकीस आले. यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी संशयित आरोपींविरोधात महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले.