कुत्र्यांच्या हल्ल्यातून मोराला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 05:46 PM2019-05-16T17:46:34+5:302019-05-16T17:46:57+5:30
सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ येथे पक्षिप्रेमींनी मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात सापडलेल्या मोरास वाचवून जीवदान दिले. येथून जवळच असलेल्या इरिगेशन बंगला परिसरात तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी एका मोरावर हल्ला केला. सुरेश चंद्रे व रेवनाथ कुमावत यांनी मोरावर झालेला हल्ला पाहिल्यानंतर त्या मोराला कुत्र्यांच्या तावडीतून मोरास सोडविले.
पाथरे : सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ येथे पक्षिप्रेमींनी मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात सापडलेल्या मोरास वाचवून जीवदान दिले.
येथून जवळच असलेल्या इरिगेशन बंगला परिसरात तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी एका मोरावर हल्ला केला. सुरेश चंद्रे व रेवनाथ कुमावत यांनी मोरावर झालेला हल्ला पाहिल्यानंतर त्या मोराला कुत्र्यांच्या तावडीतून मोरास सोडविले. यावेळी निखिल देवकर, संजय चंद्रे, ओमकार चंद्रे, सुनील चंद्रे यांच्या मदतीने जखमी मोरास घरी आणले. या सर्व तरुणांनी जखमी मोरावर उपचार करून वनविभागाचे कर्मचारी वैद्य यांना झालेल्या प्रकाराची माहिती फोनवर कळविली.
येथील स्थानिक पशुवैद्यकीय डॉ. डी. बी. वाळुंज यांना तरुणांनी बोलावून जखमी मोराला खोलवर जखम न झाल्याची खात्री करून प्रथमोपचार केले. त्यानंतर वैद्य यांनी वावी येथील प्राथमिक उपचार केंद्रास सदरची बाब कळविली. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पवार यांनीही मोराची काळजी घेत तपासणी करून तातडीने वनविभागाच्या ताब्यात दिले.
वनविभागाच्या स्वाधीन
सध्या उजव्या कालव्यास पाण्याचे आवर्तन चालू झाले आहे. त्यामुळे कोळगावमाळ परिसरात पक्षी, पशु पाण्यासाठी येत आहे. या परिसरात मोरांचे प्रमाण जास्त आहे. अशातच एक मोर पाण्यासाठी वणवण करीत असताना कुत्र्यांच्या तावडीत सापडला. त्यास स्थानिक तरुणांनी औषधोपचार करून वनविभागाच्या स्वाधीन केले.