मालेगावात महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 02:41 PM2019-07-07T14:41:07+5:302019-07-07T14:44:33+5:30
पीडित युवती महाविद्यालयात जात असताना जीवन याने तिची वाट अडवून विनयभंग केल्याचे तिने फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी किल्ला पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा जीवनविरुद्ध दाखल केला आहे.
नाशिक : मालेगाव तालुक्यातील किल्ला पोलीस ठाणे हद्दीतील मनमाड चौफुलीजवळील नाशिककडे जाणाऱ्या समांतर रस्त्यावरून जाणाºया एका महाविद्यालयीन युवतीचा संशयित आरोपी जीवन साहेबराव हिरे याने रस्ता अडवून युवतीचा स्कार्फ ओढत शिवीगाळ करून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून किल्ला पोलिसांनी संशयित जीवनविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडित युवतीचे संशयितासोबत लग्न झाले होते; मात्र त्यांनी १ मार्च २०१९ रोजी घटस्फोट घेतला असून, पीडित युवती सध्या तिच्या आई, वडिलांसोबत राहते. जीवन याने ‘कोर्टात केस का केली’ यावरून जाब विचारत, जिवे ठार मारण्याची धमकी देत पीडितेचा भर रस्त्यात विनयभंग केल्याचे तिने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. पीडित युवती महाविद्यालयात जात असताना जीवन याने तिची वाट अडवून विनयभंग केल्याचे तिने फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी किल्ला पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा जीवनविरुद्ध दाखल केला आहे. घटनेनंतर जीवन हा मालेगाव परिसरातून फरार झाला आहे. याप्रकरणी पीडितेच्या भाऊ व पीडित युवतीने थेट पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. सिंह यांनी याप्रकरणी तत्काळ जीवन यास अटक करण्याचे आदेश किल्ला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहे. संशयित जीवनची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे लक्षात आल्यानंतर तसेच सातत्याने त्याच्याकडून होणा-या छळाला कंटाळून पीडित युवतीने विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतल्याचे सिंह यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. संशयिताविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल असून, त्याच्याकडून पीडितेच्या जिवाला व कुटुंबीयांना धोका असल्याची भीती तिने तक्रार अर्जात व्यक्त केली आहे. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पीडितेने पोलिसांकडे केली आहे.