शहरात तीघींचा विनयभंग; घरात प्रवेश करत अश्लील कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 04:30 PM2020-07-21T16:30:06+5:302020-07-21T16:33:03+5:30
पिडित महिलेच्या वैयक्तिक क्रमांकाचा शोध घेऊन त्यावरसुध्दा वरील कृत्य करत स्त्री मनाला लज्जा निर्माण करून विनयभंग केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : शहर व परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शहरात एकाच दिवशी विविध भागांमध्ये तीन महिलांशी अश्लीपणे वर्तणुक करत संशयितांकडून विनयभंग करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी शिवारातील वाडीचे रान परिसरात सोमवारी (दि.२०) दुपारी संशयित अंकुश आधान (रा.विंचुर दळवी) याने थेट पिडीतेच्या घरात घुसून तीच्या अंगावरील कपडे ओढत स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत विनयभंग केला. यावेळी पिडितेचा पती अंकुशला पकडण्यासाठी आला असता त्याने त्यालाही मारहाण करत घरातून पोबारा केला. याप्रकरणी पिडितेने दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात फरार अंकुशविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत अंबड पोलीस ठाणे हद्दीत संजीवनगर भागात संशयित साहिल खान व भास्कर पट्टेबहादूर या दोघांनी मिळून अशाचप्रकारे एका पिडितेच्या घरात प्रवेश करत तीला शिवीगाळ केली. तसेच स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत प्रेमाीची मागणी घालत विनयभंग केला. पिडित महिलेने त्यांना नकार देताच तीला जीवे ठार मारण्याची धमकीदेखील दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-इन्फो--
व्हॉटस्अॅप ग्रूपवर पाठविले नग्न छायाचित्र
पारिजातनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणा-या महिलेला अनोळखी इसमाने मोबाईल क्रमांकावरून त्या ज्या व्हॉटस्अॅप ग्रूपमध्ये आहे, त्या ग्रूपमध्ये नग्न स्त्री-पुरूषांची छायाचित्रे पोस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या छायाचित्रांसोबत इंग्रजीतून काही अश्लीलप्रकारचा मॅसेजही धाडण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याचप्रमाणे अशाच पध्दतीने संशयिताने पिडित महिलेच्या वैयक्तिक क्रमांकाचा शोध घेऊन त्यावरसुध्दा वरील कृत्य करत स्त्री मनाला लज्जा निर्माण करून विनयभंग केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल हे करीत आहेत.