मुसळगाव पोलिसांकडून कारखान्यातील चोरीचा छडा; चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 05:49 PM2019-01-23T17:49:45+5:302019-01-23T17:50:25+5:30
माळेगाव औद्योगिक वसाहतीतील आटोकॉम्प इंडिया प्रा. लि. या कारखान्यातून कॉपर पाइप आणि अॅल्युमिनियम वेल्ड योकमचे बॉक्स असा सुमारे चार लाख ९८ हजार ९८३ रूपये किमतीचे साहित्य चोरी करणाऱ्या चौघा सराईत चोरट्यांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
रतन चिमा माळी (२४), संजय कोंडाजी माळी (२२, दोघे रा. पास्ते, ता सिन्नर), अजय बापू चव्हाण (२२, रा. मोहदरी) व पंकज राममुर वर्मा (२२, रा. चिंचोली फाटा, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत. माळेगाव औद्योगिक वसाहतीत प्लॉट नं. १८४/१८५ मध्ये आटोकॉम्प इंडिया प्रा. लि. हा कारखाना असून १६ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कारखान्याच्या स्टोअर रूमध्ये ठेवलेले ४ लाख २६ हजार ३६९ रूपये किमतीचे ५१८ किलो वजनाचे ४ कॉपर पाइप तसेच ७२ हजार ६१४ रूपये किमतीचे १० अॅल्युमिनीयम वेल्ंिगचे बॉक्स असा सुमारे ४ लाख ९८ हजार ९८३ रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून पोबारा केला होता. कंपनीचे भांडर व्यवस्थापक देवीदास पुंजाराम अहेर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, उपनिरीक्षक जी. पी. लावणे, हवालदार राम भवर, लक्ष्मण बदादे, पोलीस शिपाई श्रीराम हरळे, नितीन सांगळे यांच्या पथकाने चोरीचा तपास करीत संशयित रतन माळी, संजय माळी, अजय चव्हाण, पंकज वर्मा यांना अटक केली.