किडनी ट्रान्सप्लांट विभागाच्या कामाला लागेना मुहूर्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:41 AM2021-01-08T04:41:40+5:302021-01-08T04:41:40+5:30
नाशिक : नाशिकच्या विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात बांधण्यात येत असलेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट) विभागाचे काम कोरोना काळात ठप्प ...
नाशिक : नाशिकच्या विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात बांधण्यात येत असलेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट) विभागाचे काम कोरोना काळात ठप्प झाले होते. जिल्ह्यातील अन्य रखडलेल्या प्रकल्पांना डिसेंबरपासूनच प्रारंभ झाला असला, तरी या किडनी ट्रान्सप्लांट विभागाच्या कामाला मुहूर्त लागलेला नाही.
विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण विभागाच्या कामास २०१८ सालीच मंजुरी मिळाली होती. त्या कामासाठी विभागीय संदर्भसेवा रुग्णालयातच एका स्वतंत्र मजल्याचे बांधकाम करून अन्य यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या आकृतीबंधासही परवानगी देण्यता आली होती. मात्र, त्यानंतर प्रारंभी तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाल्याने बांधकामच सुरू झाले नव्हते. त्यानंतर, गतवर्षाच्या प्रारंभी बांधकामास प्रारंभ झाल्यानंतर पुन्हा कोरोनामुळे कामकाज ठप्प झाले. मात्र, आता शासनाचे अन्य सर्व प्रकल्प हळूहळू पूर्ववत सुरू झालेले असतानाही, या बांधकामाला मुहूर्त लागू शकलेला नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये हजाराहून अधिक पेशंट डायलेसिसवर आहेत, तर नाशिक विभागात ही संख्या तीन हजारांहून अधिक आहे. अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयातील किडनी ट्रान्सप्लांटचा खर्च परवडत नसल्याने, विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात किडनी ट्रान्सप्लांट विभाग कधी कार्यरत होतो, याकडे हे रुग्ण डोळे लावून बसले आहेत. त्यांच्यासाठी हा किडनी ट्रान्सप्लांट विभाग मोठे जीवदान ठरू शकतो. किडनी प्रत्यारोपणासाठी रिट्राइव्हल सेंटर म्हणून नाशिकमधील संदर्भसेवा रुग्णालयास केव्हाच परवानगी मिळाली आहे. मात्र, बांधकामाचे स्ट्रक्चरच उभे राहू शकलेले नसल्याने पुढील सर्व प्रक्रियाच ठप्प झालेली आहे.
लवकरच कामकाजास प्रारंभ
किडनी ट्रान्सप्लांट विभागाचे काम कोरोनामुळे बंद होते. मात्र, आता बांधकाम विभागाकडे त्याबाबत विचारणा करण्यात आली असून, त्यांच्याकडून लवकरच कामाला पुन्हा प्रारंभ करण्यात येणार आहे.
डॉ.मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, आरोग्य उपसंचालक