संरक्षक भिंतीला लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 10:03 PM2020-05-25T22:03:35+5:302020-05-26T00:11:50+5:30

नाशिक : जुन्या नाशकातील गावठाणांमधील पडक्या वाड्यांइतकीच काझी गढी धोकादायक आहे. अनेक वर्षांपासून जीव मुठीत धरून राहणारे स्थानिक नागरिक जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे याठिकाणी गढीला संरक्षक भितींचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी इस्टिमेट आखले गेले, खर्चाचे अंदाज आखले गेले. परंतु खासगी जागेवर बांधकाम करण्यास महापालिकेला अधिकार नाही आणि दुसरीकडे शासनाकडून निधी आला नाही.

Moment without touching the protective wall | संरक्षक भिंतीला लागेना मुहूर्त

संरक्षक भिंतीला लागेना मुहूर्त

Next

नाशिक : जुन्या नाशकातील गावठाणांमधील पडक्या वाड्यांइतकीच काझी गढी धोकादायक आहे. अनेक वर्षांपासून जीव मुठीत धरून राहणारे स्थानिक नागरिक जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे याठिकाणी गढीला संरक्षक भितींचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी इस्टिमेट आखले गेले, खर्चाचे अंदाज आखले गेले. परंतु खासगी जागेवर बांधकाम करण्यास महापालिकेला अधिकार नाही आणि दुसरीकडे शासनाकडून निधी आला नाही. परिणामी गढीचा धोका कायम आहे. गेल्या अनेक वर्षांत हा न सुटलेला प्रश्न यंदाही जैसे थे आहे.
शहरातील जुन्या नाशिक गावठाणातील शंभर, दोनशे वर्षांपूर्वीचे वाडे आता जीर्ण झाले आहेत. त्यातील अनेक वाडे पडण्यावर आले आहेत. तर काही दर पावसाळ्यात कोसळत आहेत. त्यालगतच असलेली ही काझीची गढी. गढीला अनेक वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. तथापि, सध्या कोणीही वारस फिरकत नसल्याने ही जागी स्थलांतरितांसाठी मोक्याची बनली आहे. गढीचा एका भाग अत्यंत तीव्र उताराचा आहे. त्याच्या काठावर असलेल्या झोपड्यांना अत्यंत धोका आहे.
पावसाळ्यात पाणी मुरल्यानंतर गढीवरील माती ढासळू लागली की, नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मग, शासकीय यंत्रणेची धावपळ होते. महापालिकेच्या वतीने नागरिकांना स्थलांतरित करण्याचा पर्याय असला तरी स्थानिक राजकारण आडवे येते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते मग हीच वेळ आहे, शासनाकडून, प्रशासनाकडून काहीतरी मागून घेण्याची. अशाप्रकारे मग तडजोडी सुरू होतात.
२०१७-१८ मध्ये अशाच प्रकारे ढासळणाऱ्या गढीचा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी सत्तेवर असलेले नसलेले सर्वच एकत्र आले आणि मग वर्षानुवर्षे गढीला कोट म्हणजेच संरक्षक भिंत बांधण्याची मागणी पुढे आली. त्यासाठी मग माती परीक्षण करण्यासाठी मेरीला नमुने पाठविण्यात आले. त्यांनी परीक्षण करून अहवाल दिला. काझीची गढी ही खासगी जागा असल्याने त्यावर सुमारे पाच ते सात कोटी रुपयांचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी शासनाकडून रक्कम आणून देऊ, असे आश्वासन दिले. परंतु गेल्या तीन वर्षांत निधी आला नाही की भिंत बांधली गेली नाही. राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभागानेदेखील याबाबत काहीच उत्सुकता दाखवली नाही. परिणामी काझी गढीला संरक्षक भिंत बांधण्याचा प्रश्न सुटलेला नाही.
---------------------------
गढी नव्हे, खरे तर ऐतिहासिक वारसा !
भारतीय पुरातत्त्व विभागाची संरक्षित वास्तू असलेली ऐतिहासिक प्राचीन मातीची जुनी गढी म्हणजेच काझी गढीच्या तळाशी प्राचीन काळी ताम्रपाषाण युगातील नागरी वस्ती असावी, असा अंदाज वेळोवेळी झालेल्या उत्खननामधून तज्ज्ञांनी लिहून ठेवला आहे. या प्राचीन टेकडीवर १८८३ व १९०८ साली उत्खनन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा परिसरात १९५०-५१ सालात भारतीय पुरातत्त्व विभाग व डेक्कन कॉलेजच्या वतीने नियमित उत्खनन करण्यात आले. भारतीय पुरातत्त्व विभागाने ही वास्तू ऐतिहासिक प्राचीन ठेवा म्हणून संरक्षित केली आहे. भारत सरकारच्या तत्कालीन पुरातत्त्व शिक्षण मंत्रालयाने १९४९-५० साली काझीची गढी प्राचीन स्मारके जतन कायद्यान्वये संरक्षित वास्तू म्हणून घोषित केली.
---------------------
गढीला वारस असून जणू ती स्थलांतरितांसाठी आश्रयस्थान झाली आहे. १९९० पूर्वी गढीचा काही भाग ढासळून दुर्घटना घडली होती. त्यावेळी तत्कालीन झोपडपट्टीवासीयांसाठी गाडगे महाराज वसाहत बांधून त्यात घरे देण्यात आली होती. या गढीवर कोणीही या आणि झोपडी टाका असे सुरू झाल्याने तेथे पुन्हा झोपड्या आणि पुन्हा पुनवर्सनचे प्रश्न यातच गढी गुरफटली आहे.

Web Title: Moment without touching the protective wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक