सोमठाणमध्ये गोदापात्रातून वारेमाप वाळूची चोरी
By श्याम बागुल | Published: November 24, 2018 05:34 PM2018-11-24T17:34:32+5:302018-11-24T17:36:19+5:30
गेल्या वर्षी व यंदाही जिल्ह्यातील वाळू ठिय्यांचे लिलाव झालेले नाहीत, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कोरड्याठाक पडलेल्या नद्यांमधून वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी केली जात आहे. तर परजिल्ह्यातूनही रात्री-अपरात्री वाळूचे ट्रक शहरात दाखल होत आहेत. शासनाचा महसूल बुडवून आणल्या जात
नाशिक : जिल्ह्यातील अनधिकृत गौणखनिजाचा उपसा व चोरीच्या विरोधात महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जात असताना सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे गोदावरी नदीच्या पात्राजवळच मोठ्या प्रमाणावर बेकादेशीरपणे वाळूचा उपसा केला जात असून, त्याकडे मात्र सोयिस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. या उपशासाठी यंत्राचा वापर करण्याबरोबरच, अवजड वाहनांद्वारे वाळूची वाहतूक केली जात असल्याची छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे.
गेल्या वर्षी व यंदाही जिल्ह्यातील वाळू ठिय्यांचे लिलाव झालेले नाहीत, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कोरड्याठाक पडलेल्या नद्यांमधून वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी केली जात आहे. तर परजिल्ह्यातूनही रात्री-अपरात्री वाळूचे ट्रक शहरात दाखल होत आहेत. शासनाचा महसूल बुडवून आणल्या जात असलेल्या वाळूची तस्करी रोखण्यासाठी महसूल खात्याकडून प्रयत्न केले जात असले तरी, त्याला पूर्णपणे आळा बसलेला नाही. उलट वाळू माफियांशी संधान बांधून वाळू चोरीला उत्तेजन दिले जाते की काय अशी शंका घेण्यास वाव असलेले काही पुरावे सोशल माध्यमावर व्हायरल होत आहेत. सिन्नर तालुक्यातील सोमठाण गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरीच्या पात्रालगत अशाच प्रकारे बेकायदेशीर वाळूचा गेल्या काही महिन्यांपासून वारेमाप उपसा केला जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. नदीमधून वाळू उपसा करण्यासाठी यंत्राचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी असताना सोमठाणच्या वाळू ठिय्यांवर यंत्र सामग्रीच बसविण्यात आली असून, जेसीबी व पोकलॅन्डच्या सहाय्याने उपसलेली वाळू मोठ्या अवजड ट्रकमध्ये भरण्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. खुलेआम सुरू असलेल्या या प्रकाराचा गंध जागरूक (?) महसूल यंत्रणेला लागू नये याविषयी परिसरातील शेतकºयांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे गोदावरीच्या काठावर एका राजकीय पुढाºयाच्या नातेवाइकाने मत्स्यपालनाची अनुमती घेतली होती व त्यासाठी काही प्रमाणात नदीपात्राला लागून वाळूचा उपसा केला होता. त्यावेळी घेतलेल्या अनुमतीच्या आड आजही दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही पर्यावरणप्रेमींनी थेट या वाळू उपसा ठिकाणावर जाऊन छायाचित्र काढून ते सोशल माध्यमावर व्हायरल करून महसूल खात्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्याला अद्याप तरी प्रतिसाद मिळालेला नाही.