दोन सत्रांत कामकाज : सोमवारपासून न्यायालये ' बिगेन अगेन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 09:27 PM2020-06-07T21:27:48+5:302020-06-07T21:45:30+5:30
न्यायालयांची वर्गवारी करण्यात आली असून त्यात रेड झोनमध्ये असलेल्या महापालिकांमध्ये असलेले न्यायालये 'ए' वर्गवारीत
नाशिक : लॉकडाऊननतर सोमवारपासून (दि.८) न्यायालयांचे कामकाज सकाळी १० ते १ आणि दुपारी २.३० ते ५.३० अशा दोन सत्रांमध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे न्यायालयीन कामकाज ऑनलाइन पद्धतीने अधिक व्हावे, यासाठी नाशिक बार असोसिएशनच्या वतीने ई गव्हर्नन्स आणि ई फायलिंग सेंटर उभारण्यासाठी मागणी करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला. त्यामुळे भविष्यात हे सेंटर कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशभरात लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्येही कर्मचारी कपात करुन कामकाज सुरु होते. त्याचप्रमाणे न्यायालयातही कर्मचारी व न्यायाधीशांच्या कामकाजाचे स्वरुप बदलले होते. मोजके न्यायाधीश व कर्मचाऱ्यांच्या मदतीने फक्त अतिमहत्वाचे व दैनंदिन कामकाज सुरु होते. मात्र आता लॉकडाऊन शिथील केले जात असल्याने न्यायालयाचेही कामकाज वाढवण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार न्यायालयांची वर्गवारी करण्यात आली असून त्यात रेड झोनमध्ये असलेल्या महापालिकांमध्ये असलेले न्यायालये 'ए' वर्गवारीत असून तेथे फक्त अत्यावश्यक कामकाज होणार आहे. तर इतर क्षेत्रामंधील न्यायालये 'ब' वर्गवारीत असून तेथे ५० टक्के कामकाज सुरु होणार आहे. त्यामुळे नाशिक व मालेगाव येथील न्यायालयांमध्ये लॉकडाऊन काळात जसे कामकाज सुरु होते त्याचप्रमाणे सुरु राहणार असून फक्त कामकाजाची वेळ वाढवली आहे. तर इतर न्यायालयांमध्ये वेळेसोबत कामकाजही वाढवण्यात येणार आहे.
'बार'ची सभा वेबिनारद्वारे
बार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा वेबिनारच्या माध्यमातून झाली. त्यात उच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनांनुसार न्यायालयाचे कामकाज सुरु करण्याबाबत चर्चा झाली. न्यायालयात वकील व पक्षकारांची गर्दी टाळण्यासाठी ई गव्हर्नन्स आणि ई फायलिंग सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हा न्यायालयातील आय.टी. बार लायब्ररीमध्ये सेंटर सुरू करण्यासाठी मागणी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामार्फत दावे, केसेस, अपिल्स, रिव्हिजन्स दाखल करणे व विविध प्रकरणांमध्ये युक्तिवाद सेंटर मधून करणे शक्य होईल. तसेच वकिलांना ई गव्हर्नन्स आणि ई फायलिंग बाबत माहिती देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष व सदस्य ॲड. जयंत जायभावे व ॲड. अविनाश भिडे, ॲड. श्रीधर माने, ॲड. सुधीर कोतवाल, आदींनी सहभाग घेतला. सभेचे सूत्रसंचालन सचिव ॲड. जालिंदर ताडगे व सहसचिव ॲड. शरद गायधनी यांनी केले तर आभार खजिनदार ॲड. संजय गिते यांनी मानले.