धार्मिक स्थळांबाबत सोमवारी निर्णय
By admin | Published: November 4, 2016 01:11 AM2016-11-04T01:11:34+5:302016-11-04T01:14:07+5:30
महापालिका : पोलीस बंदोबस्त मागितला
नाशिक : महापालिकेने शहरातील ८४ अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटिसा बजावल्यानंतर आता कारवाईच्या दृष्टीने तयारी सुरू केली असून, येत्या सोमवारी (दि.७) पोलीस अधिकाऱ्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत कारवाईची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, काही धार्मिक स्थळे स्वत:हून काढून घेण्याची तयारी काही विश्वस्तांनी दर्शविली असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली.
महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार केलेल्या सर्वेक्षणात शहरात सन २००९ नंतरची ३१६ धार्मिक स्थळे अनधिकृत आढळून आली आहेत. त्यातील मनपाच्या हद्दीतील २८४ धार्मिक स्थळे असून, २१८ धार्मिक स्थळे ही मनपाच्या जागेवर आहेत. त्यामधील ८४ धार्मिक स्थळे ही रस्त्यांना अडथळा ठरणारी आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सदर धार्मिक स्थळे हटविण्यासाठी महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार, सहाही विभागातील ८४ धार्मिक स्थळांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत आणि येत्या ७ नोव्हेंबरपासून कारवाईचा इशारा दिलेला आहे.
तत्पूर्वी, बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विभागनिहाय बैठका घेऊन संबंधिताना कारवाईची माहिती दिली आणि स्वत:हूनच धार्मिक स्थळे हटविण्याची सूचना केली. परंतु, महंतांसह राजकीय नेत्यांनी सदर धार्मिक स्थळे हटविण्यास विरोध दर्शवित फेरसर्वेक्षणाची मागणी केली आहे. त्यानुसार, महापालिकेने येत्या ७ नोव्हेंबरला पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलाविली असून, त्यावेळी कारवाईबाबतचे धोरण निश्चित केले जाणार आहे. (प्रतिनिधी)