सोमवार ठरला ‘आंदोलन’ वार

By admin | Published: October 27, 2015 12:00 AM2015-10-27T00:00:11+5:302015-10-27T00:01:59+5:30

कॉँग्रेसचे धरणे : राष्ट्रवादीचा थाळीनाद; घरकुल, धान्यासाठी निदर्शने

Monday's 'movement' war | सोमवार ठरला ‘आंदोलन’ वार

सोमवार ठरला ‘आंदोलन’ वार

Next

नाशिक : वरणातून गायब झालेल्या तूरडाळीमुळे कॉँग्रेसचे धरणे आंदोलन, महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीने केलेला थाळीनाद, महापालिकेच्या घरकुलाचा ताबा मिळावा, तसेच रेशनवर स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी झालेल्या निदर्शन आंदोलनांनी सोमवार चांगलाच गाजला. दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाण मांडून बसलेल्या आंदोलनकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
कॉँग्रेसचे धरणे आंदोलन
वाढत्या महागाईत केंद्र व राज्य सरकारला जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसने दिलेल्या आदेशानुसार सोमवारी सकाळपासून शहर-जिल्हा कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन दुपारी शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना मागणीचे निवेदनही सादर केले. त्यात म्हटले आहे की, जनतेला भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला महागाई कमी करण्यास वेळ मिळालेला नाही, परिणामी ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळींच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्वस्त दरात धान्य दुकानांमधून पुरेशा प्रमाणात डाळी व धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात आमदार निर्मला गावित, शोभा बच्छाव, राजाराम पानगव्हाणे, शरद अहेर, हेमलता पाटील, राजेंद्र बागुल, वत्सला खैरे, वसंत ठाकूर, पांडुरंग बोडके, हनिफ बशीर, उद्धव पवार, सुरेश मारू, अ‍ॅड. विक्रांत माने, विमलताई पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचा थाळीनाद
वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत, राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री चुंभळे, सत्यभामा गाडेकर, कविता कर्डक, सोमनाथ खताळे, विष्णुपंत म्हैसधुणे, दीपक वाघ, तानाजी गायधनी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार गणेश राठोड यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Monday's 'movement' war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.