पैसा सुख-समाधानाचे साधन नाही : गोविलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:52 AM2018-05-08T00:52:44+5:302018-05-08T00:52:44+5:30
एखाद्या व्यक्तीने खूप संपत्ती मिळविली म्हणजे तो सुखी झाला, असे मुळीच नाही. पैसा हे सुख-समाधानाचे साधन अजिबात नाही. त्यामुळे पैसा आला की सुख मिळेल असा गैरसमज समाजाने दूर करायला हवा, असे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले.
नाशिक : एखाद्या व्यक्तीने खूप संपत्ती मिळविली म्हणजे तो सुखी झाला, असे मुळीच नाही. पैसा हे सुख-समाधानाचे साधन अजिबात नाही. त्यामुळे पैसा आला की सुख मिळेल असा गैरसमज समाजाने दूर करायला हवा, असे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले. प्रौढ नागरिक मित्रमंडळाच्या वतीने कॉलेजरोड परिसरातील डिसूझा कॉलनीमध्ये आयोजित व्याख्यानमालेचे सोमवारी (दि.७) सहावे पुष्प गोविलकर यांनी ‘श्री लक्ष्मीचे अध्यात्म’ या विषयावर गुंफले. यावेळी ते म्हणाले, जीवन जगण्यासाठी सुविधा उपलब्ध असल्या तरी त्याच्या गरजा भागविण्यासाठी त्याला काहीतरी काम करावेच लागते. त्याशिवाय त्याच्या हातात पैसा येत नाही. आपल्या संस्कृतीत लक्ष्मीला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहे. धर्माने वागून अर्थ सहाय्यासाठी काम करून नंतर पुढे मोक्षाकडे जाता येते. यावेळी त्यांनी भगवद्गीता, ज्ञानेश्वरीमधील दाखले दिले. सुख हवे असेल तर गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. गरजा पूर्ण करण्यासाठी साधने हवीत. ही साधने मिळवण्यासाठी पैशाला महत्त्व आहे. मात्र, जीवनात पैसा सेवक म्हणून चांगला आहे. पैसा मालक बनला तर अडचणीचे व घातक ठरू शकते, असेही गोविलकर म्हणाले. आनंद व समाधान या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्वर्गात जाणे हे सुख ठरू शकते. मात्र आनंद नाही, असेही त्यांनी सांगितले.