ऊर्जा राज्यमंत्र्यांकडून एकलहरे प्रकल्पाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 19:36 IST2020-02-11T19:35:10+5:302020-02-11T19:36:13+5:30
यावेळी तनपुरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्पाची माहिती जाणून घेत सकारात्मक संकेत दिल्याचे सांगण्यात आले.

ऊर्जा राज्यमंत्र्यांकडून एकलहरे प्रकल्पाची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
एकलहरे : ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी औष्णिक वीज केंद्रास भेट देऊन पाहणी केली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकलहरे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून ऊर्जा राज्यमंत्र्यांनी भेट दिल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले तर ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या अनुषंगाने मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी तनपुरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्पाची माहिती जाणून घेत सकारात्मक संकेत दिल्याचे सांगण्यात आले.
मंत्री तनपुरे यांचे प्रकल्पस्थळी आगमन झाल्यावर मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तनपुरे यांनी वीज केंद्राची पाहणी केली. त्यात कोळसा हाताळणी विभाग, कोळशाची गुणवत्ता, साठा यांची माहिती घेतली. प्लांट कंट्रोल रूम नंबर चारची पाहणी करून वीज निर्मितीची प्रक्रिया समजून घेतल्यावर अधिका-यांची बैठक घेतली. त्यात विद्युत केंद्राची वाटचाल, गुणवत्ता, निर्मिती क्षमता, मिळालेली पारितोषिके, सी.एस.आर. अंतर्गत केलेली व प्रस्तावित कामे, परिसरातील सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, एकलहरे, सिद्धार्थनगर, गंगावाडी या ठिकाणी पिण्याच्या शुद्ध पाण्याचा केलेला पुरवठा याबाबत माहिती देण्यात आली. वीज केंद्र चालविताना येणाºया अडचणी, तांत्रिक बाबींंची माहिती घेऊन दर दिवसाला लागणारा कोळसा, पाणी यांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. २१० मेगावॉट ते ६६० मेगावॉट यांची तुलनात्मक माहिती घेऊन ६६० मेगावॉटची कार्यक्षमता जास्त असल्याने वीज निर्मितीचा खर्चही कमी लागेल, असेही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.