माकडाचा उच्छाद
By admin | Published: June 18, 2014 12:45 AM2014-06-18T00:45:50+5:302014-06-18T01:12:23+5:30
cमीअंगाखांद्यावर खेळले, कडाडून चावले
वावी : तासभर गावात ग्रामस्थांच्या अंगाखांद्यावर खेळत पाऊणचार घेणाऱ्या माकडाने अचानक एकावर हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना सिन्नर तालुक्यातल्या रामपूर (पुतळेवाडी) येथे घडली.
रामपूर येथे मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास माकडाचे आगमन झाले. मारुती मंदिरासमोर आलेले माकड पाहण्यासाठी गर्दी झाली. शेंगदाणे, गूळ, कांदे, फळे खाताना मर्कटलीला दाखवत त्याने ग्रामस्थांची करमणूक केली. काही उत्साही तरुणांनी त्याच्यासोबत हस्तांदोलन करताना फोटोसेशनही केले. माकड पाळीव असल्याचा समज झालेल्या ग्रामस्थांनी त्याला दुचाकीवर घेत फेरफटकाही मारण्याचा आनंद लुटला.
याच वेळी वीज वितरण कंपनीत नोकरीस असलेल्या सुधाकर शंकर नरोडे आपल्या दुचाकीहून मारुती मंदिरासमोर आले. नरोडे घटनास्थळी थांबून मर्कटलीला पाहताना माकडाने त्यांच्या दुचाकीवर उडी मारुन पेट्रोल टाकीवर बैठक मारली. नरोडे यांनाही माकडाला सोबत घेऊन दुचाकीवर चक्कर मारण्याचा मोह आवरला नाही.
नरोडे यांनी माकडला घराकडे नेऊन खाऊ पिऊ घातले. माकडाला आपला लळा लागल्याचा (गैर)समज नरोडे यांचा झाला. सर्वकाही आनंदात सुरु असतांना अचानक माकडाने नरोडे यांच्यावर हल्ला केला. नरोडे यांच्या उजव्या हाताला माकडाने कडाडून चावा घेतला. नरोडे यांच्या मदतीला धावलेले दशरथ पुंजा म्हस्के यांच्यावरही माकडाने हल्ला केला. यात म्हस्के किरकोळ जखमी झाले. ग्रामस्थांनी एकच आरडाओरड केल्याने माकड दूर पळाले. त्यानंतर ग्रामस्थांनी जखमी नरोडे यांना तातडीने वावी येथील डॉ. कमलाकर कपोते यांच्या रुग्णालयात आणून उपचार केले. (वार्ताहर)