नाशिकला मॉन्सून दाखल एका दिवसात ६३ मिलिमीटरची हजेरी
By admin | Published: June 16, 2014 11:22 PM2014-06-16T23:22:32+5:302014-06-17T00:09:28+5:30
नाशिकला मॉन्सून दाखल एका दिवसात ६३ मिलिमीटरची हजेरी
नाशिक : आधी केरळ आणि नंतर कोकणात दाखल झालेल्या मॉन्सूनने गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आणि आता दोन दिवसांपासून नाशिकमध्येही हजेरी लावल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि. १६) जिल्ह्यात ६३ मिलिमीटर पावसाची नोेंद करण्यात आली.
रविवारी मध्यरात्री साडेतीन ते चारच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली होती. त्यात सोमवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. दुपारनंतर काही भागात पावसाला रिमझिम सुरुवात झाली. दुपारी साडेतीननंतर मात्र काही वेळ शहराच्या प्रमुख भागात पावसाने दमदार हजेरी लावली. सोमवारी दिवसभरात ६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ती तालुकानिहाय पुढीलप्रमाणे- नाशिक- ६ मि.मी., इगतपुरी- ६, दिंडोरी- १, पेठ- ७, त्र्यंबकेश्वर व सुरगाणा- ३० मि.मी., तर अन्य तालुक्यांत पावसाची निरंक नोेंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत पावसाची हजेरी जूनच्या पहिल्या आठवड्यात ९० टक्के कमी झाली आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अन् मे महिन्यातही पावसाने अवेळी हजेरी लावल्याने यंदाच्या पावसाळ्यात पाऊस कमी होण्याची चर्चा होती. त्यातच हवामान खात्याने यंदाच्या वर्षी सरासरीच्या तुलनेत अवघा ८८ ते ९० टक्केच पाऊस होणार असल्याचे जाहीर केले होते. १ ते ११ जून २०१४ दरम्यान अवघ्या १६३.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी १ ते ११ जून २०१३ दरम्यान तब्बल १५६८.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदाच्या पावसाची नोंद १६३.६ (१०.९१ टक्के) इतकी अत्यल्प झाली आहे. मागील वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, बागलाण, देवळा, सिन्नर या तालुक्यांत १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली होती.
यावर्षी मात्र १ ते ११ जूनदरम्यान दिंडोरी- ५३, इगतपुरी- २२ वगळता अन्य तालुक्यांत अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)