मातृवंदना योजनेतून ऑगस्ट महिन्यात २,०३० मातांना मिळाले २ कोटी ९ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:14 AM2021-09-03T04:14:51+5:302021-09-03T04:14:51+5:30

नाशिक : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात २,०३० महिलांना प्रत्येकी ५ हजार याप्रमाणे २ कोटी ९ लाख ३० ...

In the month of August, 2,030 mothers received 2 crore 9 lakhs from Matruvandana Yojana | मातृवंदना योजनेतून ऑगस्ट महिन्यात २,०३० मातांना मिळाले २ कोटी ९ लाख

मातृवंदना योजनेतून ऑगस्ट महिन्यात २,०३० मातांना मिळाले २ कोटी ९ लाख

Next

नाशिक : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात २,०३० महिलांना प्रत्येकी ५ हजार याप्रमाणे २ कोटी ९ लाख ३० हजार रुपयांचे वितरण करण्यात आले. २०१७ पासून केंद्र शासनाने सुरु केलेल्या या योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात १ लाख ५२ हजार ३५० मातांना एकूण ६४ कोटी ३ लाख ९३ हजार रुपयांचा लाभ प्राप्त झाला आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील २४ लाख गर्भवतींना १,००३ कोटी रुपयांची विक्रमी मदत केली आहे. राज्यात २०१७ पासून योजना सुरु झाल्यापासून ऑगस्ट २०२१ पर्यंतची ही आकडेवारी आहे. आता सप्टेंबरपासून गर्भवती नोंदणीसाठी राज्यात विशेष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. राज्यात माता व बालमृत्यू हा कळीचा विषय आहे. न्यायालयांनी याप्रकरणी अनेकदा आरोग्य विभागावर कठोर ताशेरे ओढले आहेत. तथापि माता-बालमृत्यू कमी व्हावेत, यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. खासकरून १६ आदिवासी जिल्ह्यात योजना राबविण्यात येत आहेत. गरोदरपणाच्या काळात माता कुपोषित राहू नये, यासाठी २०१७ पासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ राबविण्यात येते.

अनेक गर्भवती महिलांना गर्भधारणे दरम्यान पोषक घटक मिळत नाहीत. गर्भवतीला नऊ महिन्यांच्या काळात काही गर्भवतींना मधुमेह, रक्तदाब, अशक्तपणा यासह विविध आजारांच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेकदा ग्रामीण व आदिवासी भागात अनेक गर्भवतींना शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करावे लागते. त्यात अनेक महिलांना गर्भारपणा काळात तसेच प्रसूतीनंतर मजुरीचे काम करणे शक्य होत नाही. अशावेळी रोजगार बुडून माता व बाळ कुपोषित राहाण्याची शक्यता असते. दारिद्र्य रेषेखालील तसेच रेषेवरील मातांसाठी १ जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविण्यास सुरुवात केली. त्यात केंद्र सरकारचा वाटा ६० टक्के तर राज्य सरकारचा हिस्सा ४० टक्के निश्चित केला आहे. या योजनेत गर्भवतीस तीन टप्प्यात पाच हजार रुपये देण्यात येतात. दरवर्षी अशा महिलांचा शोध घेऊन त्यांना आर्थिक मदत केली जाते. त्यासाठी उद्दिष्ट निश्चित केले आहे. गेल्या काही वर्षात प्रशासनाने याबाबत उद्दिष्टापेक्षाही अधिक गर्भवतींची नोंदणी करून मदत दिली आहे.

इन्फो

आतापर्यंतची मदत

२०१७ ते २४ ऑगस्ट २०२१ पर्यंत सुमारे २४ लाख गर्भवतींना १,००३ कोटीची मदत केली आहे. कोरोना काळात २०२०-२१ मध्ये प्रत्यक्षात ५ लाख १० हजार ९०८ गर्भवतींना २६३ कोटी ३९ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने गर्भवती महिलांना पौष्टिक खुराक मिळण्यास मदत झाली आहे.

इन्फो

जनजागृतीसाठी विशेष सप्ताह

गर्भवतींची जास्तीत जास्त काळजी घेण्याच्या तसेच त्यांच्या गर्भारपणात त्यांना पौष्टिक अन्नाची उणीव राहू नये, या दृष्टीने योजनेचा अधिकाधिक प्रसार करण्यात येत आहे. त्या अंतर्गत १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत विशेष सप्ताह आयोजित केला आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त गर्भवतींची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक गर्भवती महिलांपर्यंत हा लाभ पोहोचविता येणार आहे.

Web Title: In the month of August, 2,030 mothers received 2 crore 9 lakhs from Matruvandana Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.