मासिक पासधारकांना अनारक्षित रेल्वेतून करता येणार प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 12:52 AM2022-02-25T00:52:40+5:302022-02-25T00:52:58+5:30
मासिक पासधारकांना अनारक्षित रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये प्रवास करण्यात येणार असल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिले आहे. मात्र आरक्षित रेल्वे प्रवासी गार्डनमध्ये सर्वसामान्यांचा प्रवास कधी सुरू होणार याकडे लक्ष लागून आहे.
मनमाड : मासिक पासधारकांना अनारक्षित रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये प्रवास करण्यात येणार असल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिले आहे. मात्र आरक्षित रेल्वे प्रवासी गार्डनमध्ये सर्वसामान्यांचा प्रवास कधी सुरू होणार याकडे लक्ष लागून आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने ८ ऑक्टोबर २०२१ रोजी काही वर्गांना काही अटींवर पॅसेंजर रेल्वेगाड्यांमधून प्रवास करण्यास मुभा दिली. त्यात पूर्ण लसीकरण झालेले तसेच सक्षम व अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असल्यासच मासिक पासधारक यांनाच (सीझन तिकीट) हा प्रवास करता येणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या कोविडसंदर्भात सर्व अटी हा प्रवास करताना बंधनकारक राहणार आहेत.
तिकीट खिडकीवरून वितरित केल्या जाणाऱ्या मासिक पास तिकिटांवर फक्त अनारक्षित पॅसेंजर गाड्यांसाठी हे मासिक पास (सीझन तिकीट) आहे, असा शिक्का राहणार आहे. तसेच ज्या मेल - एक्स्प्रेस गाड्यांना परवानगी असेल त्या गाड्यांचा उल्लेखही त्यावर स्पष्टपणे केला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मनमाड - मुंबई पंचवटी एक्स्प्रेससह सर्व डेमू पॅसेंजर गाड्यांच्या यात समावेश आहे. आता पंचवटीसह भुसावळ - इगतपुरी मेमू, पुणे पॅसेंजर, अजिंठा एक्स्प्रेस, धर्माबाद एक्स्प्रेस या गाड्यांमधून प्रवास करण्यास पासधारकांना रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील जिव्हाळ्याच्या व प्रवासीप्रिय असलेल्या इतर एक्स्प्रेस गाड्या आरक्षित असल्याने या गाड्यांतून यापुढेही रेल्वे पासधारकांना प्रवास करण्यास बंदी राहणार आहे. या गाड्यांतून किंवा इतर आरक्षित डब्यांमधून पासधारकांनी प्रवास केल्यास त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार असल्याची माहितीदेखील प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.