छायाचित्रांतून उलगडले ‘मूड्स’
By admin | Published: October 19, 2015 11:29 PM2015-10-19T23:29:57+5:302015-10-19T23:30:12+5:30
प्रदर्शन : कुंभमेळ्याच्या नाना छटा वेधताहेत लक्ष
नाशिक : कधी स्नानाचा आनंद लुटताना, कधी स्वयंपाक करताना, तर कधी नामस्मरणात दंग असतानाच्या साधूंच्या नाना भावमुद्रा... शाही पर्वणीचा रंगलेला सोहळा.. अधिकाऱ्यांचे तणावाचे क्षण... सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अशा अनेकविध छटांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला... निमित्त होते ‘मूड्स आॅफ कुंभ’ या छायाचित्र प्रदर्शनाचे.
अनिल पाटील, महेश कट्यारे, राम पवार, सचिन पाटील, समीर बोंदार्डे व श्रीकांत नागरे या शहरातील सहा छायाचित्रकारांनी एकत्र येऊन कुंभमेळ्यात काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. आमदार बाळासाहेब सानप, जयंत जाधव, ज्येष्ठ चित्रकार धनंजय गोवर्धने, आर्किटेक्ट संजय पाटील, ज्येष्ठ चित्रकार भि. रा. सावंत, राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, शैलेश कुटे, राजश्री कुटे आदिंच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे आज उद्घाटन झाले.
उद्या (दि. २०) दिवसभर तिडके कॉलनी येथील एस. एस. के. हॉटेलमध्ये सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत ते सर्वांना पाहण्यासाठी खुले आहे. प्रदर्शनात सुमारे दीडशे छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. त्यांतून साधूंची दिनचर्या, त्यांच्या विविध भावमुद्रा, शाहीस्नान, भक्तिभाव, मिरवणुका, हटयोग, भाविकांचा भक्तिभाव, स्नानाची उत्सुकता, अधिकाऱ्यांची तारांबळ आदि कुंभमेळ्याच्या अनेक बाजूंचा परामर्श घेण्यात आला आहे. प्रदर्शनातील छायाचित्रांच्या विक्रीतून जमा होणारी रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘नाम’ फाउंडेशनला दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)