‘चाँद फिर निकला’ मैफलीने श्रोते मंत्रमुग्ध
By admin | Published: October 28, 2015 11:56 PM2015-10-28T23:56:25+5:302015-10-28T23:57:46+5:30
‘चाँद फिर निकला’ मैफलीने श्रोते मंत्रमुग्ध
नाशिक : हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, बाप्पा मोरया रे, गोऱ्या गोऱ्या गालावरी, झुमका गिरा रे अशा हिंदी-मराठी गाण्यांचे सादरीकरण बाबाज् थिएटर प्रस्तुत ‘चाँद फिर निकला’ या कार्यक्रमात करण्यात आले. कोजागरी पौर्णिमेनिमित्त कॅनडा कॉर्नर येथील रामदास उद्यानात करण्यात आले होते.
या कार्यक्रमात झी मराठी फेम राहुल सक्सेना, सावनी रवींद्र, प्रसेनजीत कोसंबी यांनी सदाबहार गाण्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मराठी-हिंदी गाण्यांबरोबरच गवळणी, कोळी गीते, लावणी अशा विविध गाण्यांचे सादरीकरण यावेळी उपस्थित गायकांकडून करण्यात आले. यावेळी अमोल पाळेकर- तबला, अभिजित शर्मा- आॅक्टोपॅड, अनिल धुमाळ आणि कन्हैया खैरनार की बोर्ड, नीलेश सोनवणे- गिटार, फारूक पिरजादे आणि स्वरंजय धुमाळ- ढोलकी आणि मनोज गुरव यांनी बासरी वाजवून साथसंगत केली. संगीत संयोजन राम नवले यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सुपेकर यांनी केले.
उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या संगीत मैफलीचे आयोजन मनपा नगरसेवक उत्तमराव कांबळे, समीर कांबळे यांनी केले होते. कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच रसिकश्रोते उपस्थित होते. (प्रतिनिधी)