मनमाडला रिपाइंचा उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 11:17 PM2021-02-02T23:17:42+5:302021-02-03T00:05:45+5:30
मनमाड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा व ढिसाळ कारभाराच्या विरोधात मनमाड शहर रिपाइंच्या वतीने रुग्णालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
मनमाड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा व ढिसाळ कारभाराच्या विरोधात मनमाड शहर रिपाइंच्या वतीने रुग्णालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
रिपाइंचे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ अहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली रिपाइं भवनापासून मोर्चा काढण्यात आला. रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत शहराच्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. या रुग्णालयात सुविधांचा अभाव असून, या ठिकाणी ऑक्सिजन सुविधा, सोनोग्राफी व्यवस्था, रक्तपेढी सुविधा उपलब्ध नाही. तसेच मनमाड या महत्त्वाच्या शहरातील रुग्णालयात भूलतज्ज्ञ तसेच एम.डी. डॉक्टरची आवश्यकता असताना नेमणूक करण्यात आली नाही. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
रुग्णास व नातेवाईकांना अपुऱ्या सुविधांमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत कार्यवाही न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्यात येईल, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे. मोर्चेकऱ्यांच्या वतीने रुग्णालय प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी रूपेश अहिरे, विलास अहिरे, गुरुकुमार निकाळे, सुरेश शिंदे, पी. आर. निळे, प्रमोद अहिरे, प्रदीप घुसळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.