दोनशेहून अधिक लघु उद्योजकांना मिळणार हक्काचे गाळे ! अंबड औद्योगिक क्षेत्रात नवा प्रकल्प पूर्ण : दर कमी झाल्यानंतर मिळणार जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:34 AM2018-01-01T00:34:28+5:302018-01-01T00:35:25+5:30
नाशिक : औद्योगिक क्षेत्रात पुरेशा जागेअभावी भाड्याच्या जागेत उद्योग चालवणाºयांसाठी खूशखबर असून, औद्योगिक विकास महामंडळाने उभारलेला गाळे प्रकल्प पूर्ण झाला आहे.
नाशिक : औद्योगिक क्षेत्रात पुरेशा जागेअभावी भाड्याच्या जागेत उद्योग चालवणाºयांसाठी खूशखबर असून, औद्योगिक विकास महामंडळाने उभारलेला गाळे प्रकल्प पूर्ण झाला आहे. नव्या वर्षात त्यासाठी इच्छुकांचे अर्ज मागवून देकाराची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे किमान २०९ लघु उद्योजकांना हक्काची जागा मिळणार आहे.
औद्योगिक क्षेत्रात सुमारे ७० टक्के लघु उद्योजक असून, आपापल्या परीने जागा मिळवून ते उद्योग करीत असतात. तथापि, सर्वच लघु उद्योजकांना शासकीय जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे भाड्याच्या जागेतच वर्षानुवर्षे व्यवसाय करावा लागतो. सध्या सातपूर आणि अंबड औद्यागिक वसाहतीत सुमारे पाचशेहून अधिक लघु उद्योजक आहेत. याशिवाय नव्या लघु उद्योगांची भर पडत असते. काही वर्षांपूर्वी राज्य शासनाने औद्योगिक वसाहतीतील रिक्त भूखंड खासगी विकासकांना देऊन त्यात फ्लॅटेड इमारती बांधून विकण्याची मुभा दिली होती. त्यास विरोधही झाला होेता. विकासकांना भूखंड देऊन बांधण्यापेक्षा औद्योगिक विकास महामंडळानेच गाळे बांधले तर कमी दरात उपलब्ध होतील अशी भूमिका उद्योगमित्र संस्थेने घेतली होती. त्यावर न्यायालयीन लढाई यशस्वी ठरली आणि औद्योगिक विकास महामंडळाने तीनपैकी एका भूखंडावर स्वत:च फ्लॅटेड इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अंबड औद्योगिक वसाहतीत सिमेन्स कंपनीसमोर हर्ष कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून २०१५ मध्ये काम सुरू झालेली इमारत पूर्ण झाली आहे. सुमारे १४ हजार ८५० चौ.मी. क्षेत्रात बांधण्यात आलेल्या या इमारतीत २०९ गाळे असून, सहाशे ते अठराशे चौरस फूट आकाराचे भूखंड आहेत. आता जागेसाठी निविदा मागवून त्या स्थानिक तसेच यापूर्वीपासून उद्योग चालविणाºयांना देण्यात येणार आहेत. यामुळे नव्या वर्षात २०९ गाळेधारक नव्या जागेत हक्काच्या जागेत स्थलांतरित होऊ शकतील.
दर कमी होण्याची प्रतीक्षा
महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने बांधण्यात आलेल्या फ्लॅटेड इमारतीत १४ हजार ८५० चौमी क्षेत्रात ही इमारत बांधण्यात आली असून, ६०० ते १८०० अशा विविध आकारांचे एकूण २०९ गाळे उपलब्ध आहेत. या तीन मजली इमारतीत वाहनतळाची प्रशस्त जागा असून, पॅसेंजर आणि माल नेण्यासाठी स्वतंत्र लिफ्ट आहेत. तसेच तिसºया मजल्यापर्यंत मटेरियल नेण्यासाठी आणि आणण्यासाठी मालमोटार जाऊ शकेल अशी व्यवस्था असल्याने उद्योजकांच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहे. औद्योगिक विकास महामंडळाने सध्याचा भाव हा ५२५० रुपये प्रति चौरस फूट असा निश्चित केला असून, याच क्षेत्रात खासगी विकासकाने तीन हजार रुपये चौरस मीटर दराने गाळे विकल्याचे कागदोपत्री दाखवले असल्याने त्या आधारे याच दरानुसार नव्या इमारतीतील गाळ्यांचे वाटप व्हावे अशी त्यांची मागणी आहे. राज्य सरकार सध्या तरी दर कमी करण्यास अनुकूल असून, त्यामुळे नव्या वर्षात ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.