पाचशेहून अधिक उमेदवारी अर्ज
By admin | Published: February 3, 2017 01:29 AM2017-02-03T01:29:48+5:302017-02-03T01:30:00+5:30
आज अखेरचा दिवस : राजकीय पक्षांना बंडखोरीची धास्ती
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शुक्रवारी (दि.३) अखेरचा दिवस असून, गेल्या सात दिवसांत आतापर्यंत पाचशेहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बंडखोरीची धास्ती असल्याने मनसे वगळता अद्याप एकाही राजकीय पक्षाने उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध केलेली नाही. आॅनलाइन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या तीन हजाराच्या आसपास जाऊन पोहोचल्याने शुक्रवारी अवघ्या चार तासांत प्रत्यक्ष अर्ज दाखल करताना गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी सातवा दिवस होता. सात दिवस उलटून गेले तरी अद्याप मनसे वगळता एकाही राजकीय पक्षाने उमेदवारांची अधिकृत यादी घोषित केलेली नाही. मनसेने सायंकाळी आपल्या ५४ उमेदवारांची पहिली यादी घोषित करत आघाडी घेतली तर सेना-भाजपासह कॉँग्रेस-राष्ट्रवादीत उमेदवारीवरून अखेरच्या क्षणापर्यंत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या जात आहेत. गुरुवारी (दि.२) सहाही विभागमिळून ४२१ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या ५३० इतकी झाली आहे. राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवारांची यादी घोषित न केल्याने पक्षाच्या माध्यमातून अर्ज दाखल करण्यास पंचाईत झाली. त्यामुळे उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल करतानाच पक्षाच्या नावानेही अर्ज दाखल करून ठेवले. गुरुवारी एकाचवेळी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केल्याने विभागीय कार्यालये गजबजली होती. (प्रतिनिधी)