जनआरोग्य योजनेंतर्गत कोरोनाकाळात ७१ हजारांवर जास्त रुग्णांवर उपचार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:16 AM2021-07-31T04:16:27+5:302021-07-31T04:16:27+5:30
नाशिक : जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कोरोनाकाळात तब्बल ७१ हजार २१७ नागरिकांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. ...
नाशिक : जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कोरोनाकाळात तब्बल ७१ हजार २१७ नागरिकांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. कोरोनापश्चात झालेल्या म्युकरमायकोसिसच्या आजाराचाही योजनेत समावेश करण्यात आल्याने या आजाराने ग्रस्त रुग्णांनाही या योजनेचा लाभ घेणे शक्य झाले.
कोरोनाच्या उद्रेकानंतर नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार देण्याची घोषणा सरकारने केली. श्वेत वगळता अन्य सर्व शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ घेता येतो. जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पूर्णपणे नि:शुल्क आरोग्य सुविधेचा लाभ उपलब्ध करून देणे हाच या योजनेचा उद्देश आहे. मात्र, कोरोनाकाळात कोरोनाबाधित लाभार्थींचे प्रमाण कमी असण्यामागे रुग्णालयांनी दाखवलेले असहकार्य कारणीभूत ठरले होते.
इन्फो
योजनेचे लाभार्थी
या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिकाधारक ,अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व १ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत हा लाभ घेण्यासाठी रुग्णालयात असणाऱ्या आरोग्यमित्रांची मदत घेता येते. योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या रुग्णालयात आरोग्यमित्र उपलब्ध करून दिलेले असतात. योजनेंतर्गत देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, असंघटित कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र चालू शकते. त्यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहनचालक परवाना आवश्यक असतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने निर्धारित केलेली ओळखपत्रदेखील त्यासाठी ग्राह्य धरली जातात.
--------------------
ही बातमी मुख्य अंक पान २ साठी आहे.